AUS vs SL: ऑस्ट्रिलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघानं (Sri Lanka vs Australia) 26 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेच्या संघानं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. पल्लेकेले येथे गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं 43 षटकात ऑस्ट्रेलियासमोर 216 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला 37.1 षटकात 189 धावांवर ऑलआऊट केलं. महत्वाचं म्हणजे, श्रीलंकेनं तब्बल सहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2016 रोजी कोलंबो येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर मात केली होती.
पावसामुळं सामन्यात व्यत्यय
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळं सामन्यातील षटक कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची धावसंख्या 47.4 षटकांत 9 बाद 220 अशी होती, तेव्हा पावसाला सुरुवात झाली. यानंतर श्रीलंकेला उर्वरित षटक खेळण्याची संधी मिळाली नाही. श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुशल मेंडिसनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली.याशिवाय धनंजय डी सिल्वा आणि कर्णधार दासून शनाका यांनी 34-34 धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 8.4 षटकांत 35 धावांत चार विकेट्स घेतल्या. पहिला सामना खेळताना मॅथ्यू कुहनमन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
श्रीलंकेची भेदक गोलंदाजी
श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिच्या 170 धावांवर पाच फलंदाज माघारी परतले. त्यांनी अखेरच्या 19 धावांत पाच विकेट्स गमावले. स्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तर, ग्लेन मॅक्सवेलनं 30 आणि स्टीव्ह स्मिथनं 28 धावा केल्या. सामनावीर चमिका करुणारत्नेनं ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर, धनंजय डी सिल्वा, दुनिथ वेलेझ आणि दुष्मंता चमिरा यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या.
श्रीलंका ऑस्ट्रेलिया याच्यातील पुढील सामना कधी?
श्रीलंका आणि ऑस्टेलिया यांच्यातील तिसरा सामना 19 जून रोजी आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. श्रीलंका- ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी दोन्ही देशात टी-20 मालिका खेळण्यात आली होती. या मालिकेत ऑस्टेलियाच्या संघानं 2-1 नं जिंकली. एकदिवसीय मालिका संपल्यानंत दोन्ही देशांत दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
हे देखील वाचा-