Manoj Tiwari Ranji Trophy : क्रीडा मंत्री मनोज तिवारीने शतकी खेळी करत पश्चिम बंगालच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रणजी चषकात शतक झळकावणारा पहिला क्रीडा मंत्री होण्याचा मान मनोज तिवारीने पटकावलाय. रणजी चषकाच्या ८८ वर्षात असा पराक्रम कुणालाही करता आला नाही, तो मनोज तिवारीने केलाय. पश्चिम बंगालच्या संघाने रणजी चषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. 


पश्चिम बंगालने झारखंड विरोधात पहिल्या डावात विराट धावसंख्या उभारली होती. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर पश्चिम बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली.  पाचव्या दिवसाचा खेळ औपचारिक होता, ज्यामध्ये मनोज तिवारीने १३६ धावांची खेळी केली. मनोज तिवारीने दमदार फलंदाजी केली. तिवारीने १९ चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने शतकी खेळी केली. या सामन्यात शाहबाज अहमदने 46, अनुस्तूप मजूमदारने 38 आणि अभिषेक पोरेलने 34 धावांची खेळी केली. या तिन्ही फलंदाजांनी पहिल्या डावातही मोठी धावसंख्या उभारली होती.  


एकाकी सामना -
पश्चिम बंगाल आणि झारखंडचा सामना एकतर्फी राहिला. पश्चिम बंगालने पहिल्या डावात सात बाद ७७३ धावा चोपल्या होत्या. नऊ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत विक्रमाला गवसणी घातली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले. झारखंडसाठी शाहबाज नदीमने 59 धावांत पाच विकेट घेतल्या. तर पहिल्या डावात विराट सिंहने 136 धावा केल्या होत्या. 


उपांत्य फेरीत कुणाशी सामना?
उपांत्य फेरीमध्ये पश्चिम बंगालचा सामना मध्य प्रदेशसोबत होणार आहे. यातून विजेता झालेला संघ फायनलमध्ये धडक मारेल. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील विजेता संघ फायनलला पोहचणार आहे. या दोन उपांत्य फेरीच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


दरम्यान, रणजी ट्राफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्य पूर्व सामन्यात बलाढ्य मुंबईने उत्तराखंडचा तब्बल 725 धावांनी पराभव केलाय. यासह मुंबईने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. आतापर्यंत कोणत्याही संघाला इतक्या मोठ्या फरकाने सामना जिंकता आलेला नाही. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहेच, शिवाय जगातील सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा विराट विजय आहे. 1929-30 मध्ये न्यू साउथ वेल्सने क्वीन्सलँडवर तब्बल 685 धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. आता 93 वर्षानंतर मुंबईने हा विक्रम मोडीत काढलाय. रणजी चषकात सर्वाधिक धावांने विजय मिळवण्याचा विक्रम पश्चिम बंगालच्या नावावर होता. पश्चिम बंगालने 1953-54 मध्ये ओडिशाचा 540 धावांनी पराभव केला होता. हा विक्रमही मुंबईने मोडलाय.