Stuart Broad On Yuvraj Singh 6 six one over : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका सुरु आहे. अखेरचा कसोटी सामना सुरु असतानाच इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निवृत्तीची घोषणा केली. ब्रॉड याच्या या निर्णायाचं सर्वांनीच स्वागत केले. सहकाऱ्यांनी त्याला गार्ड ऑफ ऑनर देत सन्मान केला. यावेळी बोलताना स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या करिअर आणि रेकॉर्डवर अनेक गोष्टी सांगितल्या. 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत जेव्हा भारतीय फलंदाज युवराज सिंहने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले, तेव्हा त्याच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला? याबाबतही ब्रॉडने मन मोकळं केले. 


आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड याने युवराज सिंह याने लगावलेल्या त्या सहा षटकारांबद्दल मत व्यक्त केले. स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला  की, '2007 T20 विश्वचषकामध्ये भारतीय फलंदाज युवराज सिंह याने माझ्या 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. पण त्या षटकाने मला एक चांगला क्रिकेटर बनण्यास मदत केली. त्या षटकानंतर मी क्रिकेटर म्हणून चांगला क्रिकेटर झालो. मी आज जो आहे त्यात त्या 6 चेंडूंचा मोठा वाटा आहे. 'दरम्यान, युवराज सिंह याने सहा षटकार मारले होते, तो काळ स्टुअर्ट ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा सुरुवातीचा काळ होता. डिसेंबर 2006 मध्ये स्टुअर्ट ब्रॉड याने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2007 टी 20 विश्वचषकात युवराज सिंह याने ब्रॉडच्या सहा चेंडूवर सहा षटकार लगावले होते. आज त्याच षटकारांची आठवण स्टुअर्ट ब्रॉडला झाली. युवराजने लगावलेल्या सहा षटकारांमुळेच मी चांगला क्रिकेटर झालो, अशी कबुली ब्रॉड याने निवृत्तीनंतर दिली. 






ब्रॉडचं आंतरराष्ट्रीय करिअर कसे ?


स्टुअर्ट ब्रॉड याने मोठ्या कालावधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राज्य केलेय. ब्रॉड याने कसोटी, टी 20 आणि वनडे सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलेय.  स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकीर्द नेत्रदीपक राहिली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने 167 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 121 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने 167 कसोटी सामन्यांमध्ये 27.67 च्या सरासरीने आणि 55.77 च्या स्ट्राइक रेटने 602 विकेट घेतल्याची आकडेवारी सांगते. 


स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटी सामन्यात 20 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याशिवाय कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 3 वेळा 10 बळी घेतले. तसेच, स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी सामन्याच्या एका डावात 28 वेळा 4 बळी घेतले. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडने 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 178 विकेट घेतल्या आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर 56 टी-20 सामन्यात 65 विकेट्स आहेत. मात्र, स्टुअर्ट ब्रॉडला कधीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय तो इंग्लंडकडून एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांऐवजी कसोटी खेळत राहिला.