Stuart Broad Viral Video : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील अखेरचा सामना ओव्हल मैदानात सुरु आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निवृत्तीची घोषणा करत आपला हा अखेरचा सामना असल्याचे जाहीर केले. या सामन्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना पाहता येणार नाही. आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील अखेरच्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉड याने षटकार लगावला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉड याने लाँग ऑनवर जबराट सिक्सर मारला. हा स्टुअर्ट ब्रॉडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा चेंडू होता. या षटकारानंतर मैदानात उपस्थित चाहत्यांशिवाय स्टुअर्ट ब्रॉडच्या कुटुंबीयांनी आनंदात उड्या मारल्या. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकारांवर प्रतिक्रिया देत आहेत.
ब्रॉडचं आंतरराष्ट्रीय करिअर कसे ?
स्टुअर्ट ब्रॉड याने मोठ्या कालावधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राज्य केलेय. ब्रॉड याने कसोटी, टी 20 आणि वनडे सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलेय. स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी कारकीर्द नेत्रदीपक राहिली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने 167 कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 121 एकदिवसीय आणि 56 टी-20 सामने खेळले आहेत. स्टुअर्ट ब्रॉडने 167 कसोटी सामन्यांमध्ये 27.67 च्या सरासरीने आणि 55.77 च्या स्ट्राइक रेटने 602 विकेट घेतल्याची आकडेवारी सांगते.
स्टुअर्ट ब्रॉड याने कसोटी सामन्यात 20 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याशिवाय कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 3 वेळा 10 बळी घेतले. तसेच, स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी सामन्याच्या एका डावात 28 वेळा 4 बळी घेतले. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडने 121 एकदिवसीय सामन्यांमध्ये 178 विकेट घेतल्या आहेत. तर स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर 56 टी-20 सामन्यात 65 विकेट्स आहेत. मात्र, स्टुअर्ट ब्रॉडला कधीही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय तो इंग्लंडकडून एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांऐवजी कसोटी खेळत राहिला.