Sisanda Magala And Anrich Nortje Injury : वनडे वर्ल्ड स्पर्धेला दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधीच दक्षिण आफ्रिका संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आघाडीचे दोन गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहे. दुखापतीमुळे दोन्ही गोलंदाज विश्वचषकात खेळणार नाहीत. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहेत. त्याआधीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का मानला जातोय.  वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया आणि सिसंदा मगाला हे दोन आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे विश्वचषकाच्या संघातून ते बाहेर पडलेत. 


 घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना एनरिक नॉर्खियाला पाठीचा त्रास झाला होता. या सामन्यात तो फक्त 5 षटके टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्यानंतर त्याला आराम देण्यात आला होता. भारतात होणाऱ्या विश्वचषकाआधी तो तंदुरुस्त होईल, असे दक्षिण आफ्रिका बोर्डाला वाटले होते. पण पाठीच्या समस्येमुळे तो आता संघाच्या बाहेर आहे. रेव्हस्पोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे सिसंदा मागला हा देखील सहभागी होऊ शकणार नाही. सिसंदा मगालाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये त्याने 25.4 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. आता या दोन खेळाडूंच्या बदलीची नावे जाहीर करण्यासाठी आफ्रिकन संघाकडे २८ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे.







दक्षिण आफ्रिका संघाचे विश्वचषक अभियान -


भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे वेळापत्रक पाहिल्यास 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या मैदानावर श्रीलंका संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला 2 सराव सामने खेळण्याची देखील संधी मिळेल, एक 29 ऑक्टोबरला अफगाणिस्तान संघासोबत आणि दुसरा 2 ऑक्टोबरला न्यूझीलंड संघासोबत.


 
दक्षिण आफ्रिकेचे शिलेदार


तेंबा बवूमा (कर्णधार), रासी वान डर डुसेन, गेराल्ड कोएट्ज़ी, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी.