SA vs BAN Match Report : दक्षिण आफ्रिका संघाची विश्वचषकातील घौडदौड सुरुच आहे. दक्षिण आफ्रिकेने आज बांगलादेशचा 149 धावांच्या अंतराने मोठा पराभव केला. 383 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 46.4 षटकात 233 धावांपर्यंत मजल मारु शकला. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकातील चौथ्या विजयाची नोंद केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यात चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली. चौथ्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर होता. बांगलादेशचा 149 धावांनी दारुण पराभव केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा रनरेटही सुधारला आहे. आफ्रिकेच्या विराट विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झालाय. 


दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशचा 149 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या मोहिमेत चौथा विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेनं पाचपैकी चार सामने जिंकून आठ गुणांची कमाई केली असून, विश्वचषकाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईतल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला विजयासाठी 383 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा अख्खा डाव 47 व्या षटकांत 233 धावांत आटोपला. या सामन्यात क्विन्टॉन डी कॉकनं 174 धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेच्या डावाचा पाया घातला. त्यानं 140 चेंडूंमधली ही खेळी 15 चौकार आणि सात षटकारांनी सजवली. डी कॉकनं एडन मारक्रमच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 131 धावांची, तर हेन्ऱिक क्लासेनच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. मारक्रमनं 69 चेंडूंत 60 धावांची आणि क्लासेननं 49 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी उभारली. क्लासेननं 90 धावांच्या खेळीला दोन चौकार आणि आठ षटकारांचा साज चढवला.


महमदुल्लाहची एकाकी झुंज, आफ्रिकन तोफेचा केला समर्थपणे सामना - 


383 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय दैयनिय झाली. पण अनुभवी महमदुल्लाह याने एकाकी झुंज दिली. महमदुल्लाह  याने 111 धावांची झंझावती शतकी खेळी केली. त्याने आपल्या डावात चार षटकार आणि 11 चौकार लगावले. महमदुल्लाह याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे शाकिब अल हसनच्या बांगलादेशला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.  बांगलादेशसाठी तंजीद हसन याने 17 चेंडूत 22 धावा केल्या. तर लिटन दास याने 44 चेंडूत 22 धावांचे योगदान दिलेय. 


नजमुल हौसेन शांतो, शाकिब अल हसन, मुस्ताफिजुर रहमान, मेंहदी हसन मिराज आणि नसुम अहमद यांनी अनुक्रमे 0, 1, 8, 11 आणि 19 धावा केल्या. या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. बांगलादेशचे आठ फलंदाज 159 धावांत तंबूत परतले होते. पण महमदुल्लाह  याने एकाकी झुंज दिली. बांगलादेशचा संघ 233 धावांपर्यंत पोहचवला. 


 दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची कामगिरी कशी राहिली ?


दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. गेराल्ड कौटजी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.  गेराल्ड कौटजी याने 10 षटकात 62 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मार्को यॉन्सेन, लिडाज विलियम्स, आणि कगिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. केशव महाराज याने एक विकेट घेतली.