Smriti Mandhana Fastest ODI Hundred : राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची कर्णधार स्मृती मानधनाने इतिहास रचला आहे. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मानधनाने शानदार शतक झळकावले. महिला एकदिवसीय सामन्यात 10 शतके करणारी मानधना पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. यासह तिने वेगवान शतक ठोकले. तिने प्रतिका रावलसोबत पहिल्या विकेटसाठी 233 धावांची विक्रमी भागीदारी केली.
स्मृती मानधनाने ठोकले वेगवान शतक
पुरुष क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा विराट कोहली हा भारतीय खेळाडू आहे, तर महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधना ही कामगिरी करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. कोहलीच्या नावावर 52 चेंडूत शतक करण्याचा विक्रम आहे. दोघेही 18 क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरतात. तिने 80 चेंडूत 135 धावांची खेळी केली ज्यामध्ये 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता. मानधनाने 70 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. स्मृती मानधना ही एकदिवसीय सामन्यात दहा शतके पूर्ण करणारी पहिली महिला आशियाई क्रिकेटपटू आहे.
तीन सामन्यांत मानधनाने केल्या 241 धावा
स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण 241 धावा केल्या. तिने 120.50 च्या सरासरीने या धावा केल्या. या मालिकेत कर्णधाराची भूमिका बजावणाऱ्या मानधनाने आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या एकदिवसीय मालिकेतील विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
एकदिवसीय सामन्यात 10 शतके ठोकणारी पहिला भारतीय
आयर्लंडविरुद्धच्या या सामन्यात स्मृती मानधनाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 10 वे शतक झळकावले. या शतकासह ती एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 10 शतके पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे. ती भारतासाठी सर्वाधिक शतके करणारी महिला खेळाडू आहे. तिच्यानंतर माजी कर्णधार मिताली राजचे नाव यादीत आहे, जिने भारताकडून खेळताना 7 एकदिवसीय शतके झळकावली.
सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर?
महिलांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे. लॅनिंगने 15 शतके केली आहेत तर सुझी बेट्सच्या नावावर 13 शतके आहेत. टॅमी ब्यूमोंट आणि स्मृती मानधना यांच्या नावावर प्रत्येकी 10 शतके आहेत. श्रीलंकेच्या चामारी अटापट्टू, चार्लोट एडवर्ड्स आणि नॅट सेव्हेवर ब्रंट यांनी प्रत्येकी 9 एकदिवसीय शतके झळकावली आहेत.
हे ही वाचा -