Australia tour of Sri Lanka: श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची (Sri Lanka vs Australia) एकदिवसीय मालिका जिंकली आहे. पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाचा चार धावांनी पराभव करत मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. या आघाडीसह श्रीलंकेच्या संघानं मालिकेवरही कब्जा केलाय. या मालिकेतील पाचवा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, 30 वर्षानंतर प्रथमच श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलंय. यापूर्वी श्रीलंकेनं 1992 मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 नं पराभव केला होता. 


चरित असलंका श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार
दरम्यान, 1992 पासून श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकता आली नाही. मागील 30 वर्षात ऑस्ट्रेलियाच्या संघानं तिनदा श्रीलंका दौरा केला. ऑस्ट्रेलियानं 2004, 2011 आणि 2016 मध्ये श्रीलंकेला त्यांच्या मायदेशात एकदिवसीय मालिकेत धुळ चाखली. सध्या सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना 24 जून 2022 रोजी खेळला जाणार आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात चरित असलंकानं महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्यानं 110 धावांची खेळी केली. 


नाणफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा संघ 49 षटकांत 258 धावांत गारद झाला. असलंकानं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वानं 60 आणि वानिंदू हसरंगानं 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, पॅट कमिन्स, मॅथ्यू कुहेनमन यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या.


एक धावानं डेव्हिड वार्नरचं शतक हुकलं
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरचं एका धावानं शतक हुकलं. तो 99 धावांवर असताना बाद झालाय. त्याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 35, ट्रॅव्हिस हेडनं 27 आणि मिचेल मार्शनं 26 धावा केल्या. श्रीलंकेकडून धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने आणि जेफ्री वँडरसे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


हे देखील वाचा-