ICC Player of The Month, September 2023 : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी शुभमन गिल याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात उतरणार का? यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. शुभमन गिल याने डेंग्यूवर मात केली, त्यानंतर मैदानात सरावाला सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याची चर्चा सुरु असतानाच शुभमन गिल याला आयसीसीने खास पुरस्काराने सन्मानित केले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ हा पुरस्कार दिला आहे. 


आयसीसीने सप्टेंबर 2023 च्या प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराची घोषणा केली आहे. यंदाच्या महिन्यात शुभमन गिल (Shubman Gill) याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शुभमन गिल याने सहकारी खेळाडू मोहम्मद सिराज याला मागे टाकले आहे. त्याशिवाय डेविड मलान यालाही पछाडत गिल याने पुरस्कारावर नाव कोरले.


सप्टेंबर महिन्यात शुभमन गिल याने 80 च्या जबराट सरासरीने 480 धावांचा पाऊस पाडला होता. सप्टेंबर महिन्यात आशिया चषकात सर्वाधिक धावा शुभमन गिल याच्या नावावर आहे. आशिया चषक स्पर्धेत शुभमन गिल याने 75.5 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात शुभमन गिल याने दोन सामन्यात 178 धावा चोपल्या होत्या. त्यामुळेच शुभमन गिल याला आयसीसीने प्लेअर ऑफ दी मंथ पुरस्काराने गौरवण्यात आले. 
 
आठ डावात शुभमन गिलची कामगिरी कशी राहिली ?




शभुमन गिलने सप्टेंबर महिन्यात दोन शतक ठोकली होती.  आशिया चषकात बांगलादेशविरोधात शुभमन गिल याने शतकी खेळी केली होती. त्याशिवाय मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात शतक झळकावले होते. गिल याने यादरम्यान तीन अर्धशतकेही झळकावली आहे. आठ डावात शुभमन गिल फक्त दोन वेळा 50 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे. 


वनडेमध्ये शुभमनच्या फलंदाजाची सरासरी 65+


शुभमन गिल भारताचा टॉप क्लास फलंदाज आहे. 24 वर्षीय शुभमन गिल याने वर्षभरात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने अवघ्या 35 डावांता 66.1 च्या सरासरीने 1917 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 102.84 इतका आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. शुभमन गिल डेंग्यूमुळे विश्वचषकाच्या पिहिल्या दोन्ही सामन्याला मुकला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात गिल मैदानात दिसला नव्हता. आता डेंग्यूचा सामना केल्यानंतर तो लवकरच मैदानात परतणार आहे. गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.