Shubman Gill Catch Controversy: ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं लक्ष्य गाठायचं होतं, पण खेळाच्या पाचव्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ कोलमडून पडला आणि ऑस्ट्रेलियानं (Australia) WTC चा खिताब पटकावला. पण सामन्यानंतर ICC नं दोन्ही संघांवर कठोर कारवाई केली आहे. 


एकीकडे पराभवातून टीम इंडिया सावरते न सावरते, तेवढ्यात टीम इंडियाला (Team India) दुसरा धक्का बसला आहे. आयसीसीनं स्लोअव्हर रेटसाठी भारतीय क्रिकेट संघाला मॅच फिच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे. म्हणजे, टीम इंडियाला संपूर्ण मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे. आयसीसीनं ऑस्ट्रेलियालाही स्लो ओव्हरसाठी रेटसाठी कठोर कारवाई करत दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हरसाठी ऑस्ट्रेलियन संघाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिललाही दंड ठोठावण्यात आला आहे. 


'ते' स्टेटस शुभमन गिलला महागात 


टीम इंडियाचा स्टार फंलदाज शुभमन गिललाही मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनकडून गिल झेलबाद झाल्यानंतर गिलनं सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला होता. गिलला थर्ड अंपायरनं वादग्रस्त आऊट दिला होता. शुभमन गिलनं आयसीसीच्या कलम 2.7 चं उल्लंघन केलं आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्याबाबत सार्वजनिक टीका किंवा अनुचित टिपण्णीशी संबंधित आहे. त्यामुळे गिलला आता दंड भरावा लागणार आहे. 


महत्त्वाचे म्हणजे, स्लो ओव्हर रेटशी संबंधित खेळाडू आणि खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, निर्धारित वेळेत षटक पूर्ण न केल्यास प्रति षटकाच्या 20 टक्के मॅच फीचा दंड आकारला जातो. टीम इंडियानं निर्धारित वेळेत पाच षटकं कमी टाकल्यानं कांगारू संघही निर्धारित वेळेत चार षटकं मागे पडला. अशा परिस्थितीत भारतीय संघाला 100 टक्के मॅच फी आणि ऑस्ट्रेलियन संघाला 80 टक्के दंड भरावा लागणार आहे.


दरम्यान, अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघाचं सलग दुसऱ्यांदा WTC विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं. 2021 साली साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या WTC च्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभव झाला होता. त्या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीकडे होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानं प्रथमच डब्ल्यूटीसीचं विजेतेपद पटकावलं होतं.