कसोटी अजिंक्यपदाची गदा मिरवण्याचं टीम इंडियाचं (Team India) स्वप्न पुन्हा भंगलं. गेल्या वेळी किंवीनी तर यावेळी कांगारुंनी (Australia) टीम इंडियाला धूळ चारली. आयपीएलच्या (IPL 2023) कलर पिक्चरमधून आपण पारंपरिक व्हाईट जर्सी क्रिकेटसाठी आलो खरे. पण, पाच दिवसाचा खेळ पाहिल्यावर आपल्या खेळात तो कसोटी क्रिकेटचा फायटिंग कलरच दिसला नाही, किंबहुना फायनलसाठी पुरेसा वेळही मिळाला नसल्याचंच अधोरेखित झालं. रोहित शर्मानेही (Rohit Sharma) ती बाब मान्य केली.


पराभवातला हा एक घटक असला तरी काही चुका ज्या आपण टाळल्या असत्या तर कदाचित काही वेगळं चित्र दिसलं असतं. पहिली बाब  म्हणजे संघनिवडीपासूनच आपण एकेक पाऊल मागे टाकत गेलो का? असा प्रश्न आता पाच दिवसांचा खेळ पाहिल्यावर तसंच जडेजा आणि लायनला मिळणारा भिंगरी टर्न पाहिल्यावर पडतो. चार फास्ट बॉलर आणि एक फिरकीपटू घेऊन आपण उतरलो. तेही नंबर वन स्पिनर अश्विनला बाहेर ठेवून.


बहुदा याच टीम कॉम्बिनेशनमुळे टॉस जिंकल्यावर आपण पहिली बॉलिंग करणं पसंत केलं. पण, ते दोन्ही निर्णय चुकले असं आता तरी वाटतंय. खेळपट्टीवर अनइव्हन बाऊन्स होता आणि टर्नही. याचा अश्विनने नक्की फायदा घेतला असता. शिवाय त्याच्या नावावर 5 शतकं आणि 13 अर्धशतकं आहेत. ऑसी भूमीत अंगावर घाव झेलत त्याने हनुमा विहारीच्या साथीने सामना वाचवलाय. त्याला संघाबाहेर ठेवत आपण आपलाच खड्डा खणला आणि त्यात सामन्याच्या प्रत्येक दिवसाच्या खेळागणिक पूर्ण रुतत गेलो.


खरं तर आपण पहिल्याच दिवशी सामन्याची सूत्र ऑस्ट्रेलियाकडे दिली. म्हणजे आधी तीन बाद 72 अशा स्थितीत असलेल्या कांगारुंवरचा दबाव आपण कायम राखू शकलो नाही. किंबहुना पहिल्या दिवशी चहापानाला तीन बाद 170 ते क्लोज ऑफ प्ले तीन बाद 327 या दोन तासातच आपण मॅच घालवली. एका सेशनमध्ये 34 ओव्हर्समध्ये 157 धावांचा पाऊस कांगारुंनी पाडला. तर, आपल्या पदरी विकेटचा दुष्काळ आला. ट्रेव्हिस हेड वनडे क्रिकेटसारखी बॅटिंग करुन गेला. सोबत चिवट स्मिथ होताच. 


जेव्हा तुम्ही टॉस जिंकता, अपोझिशनला तीन बाद 72 अशा स्थितीत आणता, तेव्हा तुम्ही त्यांना 469 गाठू देणं म्हणजे पराभवाच्या दरवाज्यात एक पाऊल ठेवल्यासारखंच आहे. त्यात गेल्या दोन-तीन वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आघाडीच्या फळीने कोसळण्याचं दाखवलेलं कमाल सातत्य याही वेळी दिसलं. नुसतं खेळपट्टीवर घालवलेला वेळ आणि दोन्ही टीम्सनी खेळलेली षटकं याची आकडेवारी पाहिली तरी आपल्याला कळेल की, आपण का हरलो. म्हणजे पाहा ना, पहिल्या डावात वॉर्नर 108 मिनिटं, लबूशेन 103 मिनिटं, स्टीव्ह स्मिथ 333 मिनिटं तर, हेड 283 मिनिटं खेळपट्टीवर होते.


याउलट आपले पहिल्या पाचमधले फलंदाज पाहा - रोहित शर्मा 29 मिनिटं, शुभमन गिल 33 मिनिटं, पुजारा 35 मिनिटं आणि कोहली 56 मिनिटं मैदानात. तर केवळ अजिंक्य रहाणेच 254 मिनिटं. खेळपट्टीवर तग धरुन होता. तर शार्दूल ठाकूरनेही 156 मिनिटं टिकाव धरलेला. रहाणे- ठाकूर जोडीने जर हिम्मत दाखवली नसती, तर आपण डावानेच हरलो असतो बहुदा. आघाडीवीरांचा फ्लॉप शो आणि प्रतिस्पर्ध्यांना तीन बाद 72 अशा खिंडीत गाठल्यावर आपण त्यांना निसटू दिलं. त्यातही समोर ऑस्ट्रेलियासारखी टीम असताना तुम्ही 173 चा लीड त्यांना मिळू देता, तिथेच तुमच्या पराभवाची कथा तुम्ही लिहून जाता.


पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 ओव्हर्स बॅटिंग केली, तर भारताच्या दोन्ही डावातल्या मिळून झाल्या 69.4 आणि 63.3 ओव्हर्स, म्हणजे 133 च्या आसपास ओव्हर्स. म्हणजे आपल्या दोन्ही डावांच्या मिळून ओव्हर्सची संख्या  कांगारुंनी पहिल्याच डावात जवळपास खेळून काढली. 10 पैकी किमान 8 वेळा तरी कसोटी सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेणारा संघच सामन्यावर वर्चस्व गाजवतो. इथेही तेच घडलं.


अजिंक्य रहाणे हाच काय तो या निराशाजनक प्रवासातला आशेचा दिवा होता. त्याने संयम, जिद्द सारं काही दाखवलं. बोटावर उसळत्या चेंडूचे व्रण घेऊन तो लढला. पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला. त्याची फटक्यांची निवड, काऊंटर अटॅक करणं सारं काही नेत्रसुखद होतं. त्याच्या झुंजार बॅटिंगमुळे शार्दूल ठाकूरही एखाद्या कसलेल्या बॅट्समनसारखा अर्धशतक ठोकून गेला. अर्थात या आधीदेखील शार्दूलने फलंदाजीत चुणूक दाखवलीय. त्याच्यात एक अस्सल ऑलराऊंडर होण्याची क्षमता त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलीय.


आयपीएल फायनल 29 मे ला झाली आणि कसोटी अजिंक्यपद फायनल 7 मे रोजी सुरु झाली. अवघ्या नऊ दिवसांचा कालावधी मधल्या काळात होता. त्यात आपले पुजारा वगळता जवळपास सर्वच खेळाडू आयपीएल खेळत होते. तर, ऑस्ट्रेलियाचे ग्रीन आणि वॉर्नर वगळता अन्य एकही खेळाडू आयपीएलमध्ये नव्हता. ही बाबही पराभवाचं विश्लेषण करताना लक्षात घ्यावी लागेल. कसोटीच्या मैदानात भारत-ऑस्ट्रेलिया ठिणगी उडते, तेव्हा तिची धग पाहण्यासारखी, अनुभवण्यासारखी असते. इथे मात्र कांगारु बाजी मारुन गेले आणि पुन्हा एकदा उपविजेतेच ठरलो.