Team India Test Captaincy :  आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (WTC Final) पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे ही जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार, याची चर्चा सुरू असतानाच कर्णधार पदाच्या जबाबदारीसाठी धक्कादायक नाव समोर आले आहे. श्रेयस अय्यरकडे कसोटी संघाचे कर्णधार पद दिले जाऊ शकते. कसोटी कर्णधार होण्याच्या शर्यतीत श्रेयस अय्यर हा  केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. 


श्रेयस अय्यरला कसोटी खेळण्याचा फारसा अनुभव नाही, पण अनेक गोष्टी त्याच्या बाजूने जात असल्याने त्याचं पारडं जड दिसत आहे. अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. याशिवाय आयपीएलमध्ये अय्यरने कर्णधार म्हणूनही नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. 2020 मध्ये अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला होता. 


जसप्रीत बुमराहच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे अय्यरचा दावा अधिक मजबूत होत आहे. ऋषभ पंत कधी पुनरागमन करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. इतकेच नाही तर प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केल्यानंतर पंत पूर्वीप्रमाणे कामगिरी करू शकेल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. दुसरीकडे केएल राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये भरपूर संधी मिळाल्या आहेत, पण त्याचा फायदा घेण्यात तो अपयशी ठरला आहे. या कारणांमुळे निवडकर्ते केवळ नव्या चेहऱ्याचा विचार करण्याची शक्यताच जास्त दिसत आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.


रोहित शर्माचे कर्णधारपद जाण्याची शक्यता -


या वर्षाच्या अखेरीपर्यंत रोहित शर्मा कसोटी संघाच्या कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहित शर्मा 36 वर्षांचा असून पुढील WTC फायनलपर्यंत खेळणे त्याला शक्य नाही. रोहित शर्माचा फॉर्म आणि फिटनेस हे दोन्ही गोष्टींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


असं असलं तरी पुढील महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसोटी संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच राहणार आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. त्या दौऱ्यात भारताला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.  श्रेयस अय्यर सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. आशिया कपमध्ये अय्यरचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्याला वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाऊ शकते.