IND vs NZ 1st Test Kanpur : मुंबईकर श्रेयस अय्यरने नुकतंच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पणानंतर तब्बल 4 वर्षांनी आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळलेल्या श्रेयसने सलामीच्या सामन्यातच कमाल केली. सलामीच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम त्याने केला. यामुळे पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय खेळाडू ठरला. पण नंतर दुसऱ्या डावातही 65 धावांची खेळी केल्यामुळे पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक कऱणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.


श्रेयसने सामन्याच्या पहिल्या डावात 171 चेंडूत 105 धावा करत शतक झळकावलं. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 125 चेंडूत 65 धावा केल्या. ज्यामुळे पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. सर्वात आधी 1933-34 साली दिलावर हुसैन यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे पहिल्यांदाच अशी कामगिरी केली होती. दिलावर यांनी पहिल्या डावात 59 आणि दुसऱ्या डावात 57 धावा केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारे सुनील गावस्कर हे एक भारतीय फलंदाज आहेत. 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी पहिल्या डावात 65 आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावा केल्या होत्या. पण या दोघांपेक्षाही अधिक चांगलं म्हणजे पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावल्यामुळे अय्यर या दोघांपेक्षा पुढे आहे.


सामन्याची सद्यस्थिती


चौथ्या दिवशी एकीकडे सुरुवातीपासून भारताचे एकापाठी एक खेळाडू तंबूत परतत असताना या कसोटीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अनुभवी आर आश्विनसोबत डाव सांभाळला. आश्विनने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्यानंतर तो बाद झाला. नंतर अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण तोही 65 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर शेवटच्या फळीतील रिद्धिमान साहा (नाबाद 61) आणि अक्षर पटेल (नाबाद 28) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेर भारताने 234 धावा झाल्यानंतर डाव घोषित करत किवींना विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर गोलंदाजी करताना आश्विनने तिसऱ्याच षटकात सलामीवीर विल यंगला पायचीत करत दिवस अखेर न्यूझीलंडची अवस्था 4 वर एक बाद अशी केली आहे. आता पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. 


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha