नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ आशिया कपमध्ये लीड स्पॉन्सरशिवाय खेळणार आहे. ड्रीम 11 नं बीसीसीआयसोबतचा करार संपवल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. भारत सरकारनं गेमिंग संदर्भात नवीन कायदा केल्यानंतर ड्रीम 11 नं बीसीसीआय सोबतचा लीड स्पॉन्सरचा करार कायम ठेवण्यात असमर्थता दर्शवली होती. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबे यानं नव्या किटमध्ये फोटो शेअर केले आहेत. त्यातून आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर लीड स्पॉन्सरचं नाव नसेल, हे स्पष्ट झालं आहे. भारत पहिली मॅच 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे.
शिवम दुबेनं इन्स्टाग्रामवर नव्या जर्सीतील फोटो शेअर केले आहेत. त्यातून हे स्पष्ट होतं जर्सीवर स्पर्धेचं नाव आणि देशाचं नाव आहे. जिथं लीड स्पॉन्सरचं नाव असतं ती जागा रिकामी आहे. बीसीसीआयनं नव्या लीड स्पॉन्सरसाठी अर्ज मागवले आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागतील. तर, 16 सप्टेंबरला कागदपत्र जमा करावी लागतील. बोर्डानं यावेळी ड्रीम 11 मुळं जी स्थिती निर्माण झालीय ती भविष्यात होऊ नये यासाठी ब्लॉक्ड ब्रँड आणि प्रोहिबिटेड ब्रँडस कॅटेगरी देखील तयार केली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तसंस्थेसोबत बोलताना बीसीसीआय आणि ड्रीम 11 नं परस्पर सामंजस्यानं करार संपवल्याचं म्हटलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाईन गेमिंग प्रमोश आणि रेग्युलेशन बिलावर सही करुन कायद्यात रुपांतर केलं, त्यावेळी करार संपवल्याबद्दल माहिती समोर आली. त्यामुळं टीम इंडिया सध्या लीड स्पॉन्सरच्या शोधात आहे.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या जर्सीच्या लीड स्पॉन्सरशिपसाठी किमती निश्चित केल्या आहेत. दोन देशांमधील सामन्यांसाठी साडे तीन कोटी आणि विविध देशांच्या स्पर्धांसाठी दीड कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षात 130 सामने होणार आहेत. त्यातून 400 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या टीम इंडियाच्या जर्सीच्या लीड स्पॉन्सर राहिलेल्या कंपन्या विविध कारणांमुळं यापूर्वी अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये सहारा, स्टार, ओप्पो, बायजू आणि ड्रीम 11 देखील अडचणीत आली आहे. आता बीसीसीआयनं लीड स्पॉन्सरसाठी शोध सुरु केला आहे. त्याद्वारे 16 सप्टेंबरला लीड स्पॉन्सर संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.