लंडन : भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियानं विजेतेपद मिळवलं होतं. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विजेतेपद मिळवलेलं. आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यापूर्वीच इंग्लंडचा दिग्गज खेळाडू माजी कॅप्टन मायकल वॉन यानं मोठी भविष्यवाणी केली आहे. मायकल वॉनच्या मते 2027 च्या वर्ल्ड कपचं विजेतेपद दक्षिण आफ्रिका मिळवेल. दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. मात्र, सध्या दक्षिण आफ्रिका चांगली कामगिरी करत असल्यानं मायकल वॉननं ही भविष्यवाणी केलीय. दक्षिण आफ्रिकेनं तब्बल 27 वर्षानंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

मायकल वॉनकडून अनेकदा भविष्यवाणी केली जाते. यावेळी त्यानं म्हटलंय की मला वाटत 2027 चा वनेड वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका जिंकेल. दक्षिण आफ्रिकेनं गेल्या काही महिनयांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. त्यापूर्वी तिरंगी मालिकेतील अंतिम लढतीत त्यांचा 3 धावांनी पराभव झाला. आता दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला त्यांच्या देशात पराभूत केलं. आहे.

दक्षिण आफ्रिकेनं टेम्बा बावुमाच्या नेतृत्त्वात 27 वर्षानंतर इंग्लंडला त्यांच्याच देशात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत केलं आहे. पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडचा संघ 131 धावांवर बाद झाला होता, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं 7 विकेटनं मॅच जिंकली. दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 330 धावा केल्या. लॉर्डस मैदानावरील विदेशी संघानं केलेली सर्वात मोठी धावसंख्या आहे. आफ्रिकेनं दुसरी वनडे 5 धावांनी जिंकली. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली.

गेल्या काही दिवसांमध्ये मॅथ्यू ब्रीत्जके यानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे, ज्यानं क्रिकेट करिअरच्या पहिल्या पाच वनडेमध्ये किमान 50 धावा केल्या आहेत.

2027 च्या वर्ल्ड कपचा विचार केला असता त्याचं आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बॉम्ब्वे आणि नामिबिया करणार आहेत. या स्पर्धेत 14 संघ सहभागी होतील. एकूण 54 सामने खेळवले जाणार आहेत. दक्षिण आणि झिम्बॉब्वे आयोजक असल्यानं स्पर्धेला पात्र ठरले आहेत. नामिबियाला पात्रता फेरीतील सामने खेळून स्पर्धेसाठी पात्र ठरावं लागेल.

दरम्यान, 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानं भारताला अहमदाबाद येथील सामन्यात पराभूत केलं होतं. भारताकडून वनडे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्वाची संधी कोणाला मिळणार याची देखील चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा वनडे संघाचं नेतृत्त्व करणार की बदल होणार याबाबत चर्चा सुरु आहेत.