मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयमधील विविध पदांची निवडणूक 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि सहसचिव या पदांवर नव्यानं निवड होईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार सध्याचे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सर्व राज्य क्रिकेट संघांना 94 व्या वार्षिक बैठकीसाठी मेसेज पाठवले आहेत. ही बैठक मुंबईतील बीसीसीआयच्या हेडक्वार्टर्समध्ये होईल. रॉजर बिन्नी यांना 70 वर्ष पूर्ण झाल्यानं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.

देवजीत सैकिया यांनी सर्व राज्य क्रिकेट संघांना संदेश देताना म्हटलं की सर्वांना नोटीस जारी केलंय जातंय की 94 वी वार्षिक बैठक 28 सप्टेंबरला मुंबई येथील बीसीसीआयच्या हेडक्वार्टर्समध्ये होईल. सर्वांना या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

28 सप्टेंबरला दुबईत आशिया कप 2025 ची फायनल होणार आहे. म्हणजेच बीसीसीआयचा कोणताही उच्च पदाधिकारी फायनल मॅच लाईव्ह पाहण्यासाठी जाऊ शकणार नाही. या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाची निवड केली जाईल. बीसीसीआयचं अध्यक्षपद सध्या रिक्त असून सध्या प्रभारी कार्यभार राजीव शुक्ला यांच्याकडे आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण सिंह धुमल यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यामुळं ते तीन वर्षांच्या अनिवार्य कूल-ऑफ कालावधीत जाऊ शकतात.

देवजीत सैकिया सचिव पदावर कायम राहणार हे निश्चित आहे. जय शाह यांच्या राजीनाम्यानंतर ते सचिव बनले आहेत. प्रभतेज भाटिया आणि रोहन देसाई हे देखील त्यांच्या पदावर कायम राहतील. अरुण धुमल ब्रेकवर गेल्यानंतर अनिरुद्ध चौधरी आयपीएलचे चेअरमन होऊ शकतात.

कोणत्या पदांसाठी निवडणूक?

बीसीआयमधील विविध पदांवरील अधिकारी त्यांच्या पदांवर कायम राहतील. मात्र, 94 व्या वार्षिक बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह सचिव आणि कोषाध्यक्ष पदावर नियुक्ती होईल.