ढाका : बांगलादेशमध्ये (Bangladesh Protest) निर्माण झालेल्या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडल्याची प्राथमिक माहिती आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी शेख हसीना यांना राजीनामा देण्यासंदर्भात इशारा दिला होता. बांगलादेशमधील 1971 च्या युद्धात लढणाऱ्यांच्या वारसांना आरक्षण देण्याच्या मुद्यावरुन हा संघर्ष निर्माण झाला होता. बांगलादेशातील ढाका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आरक्षण रद्द करण्यासाठी संघर्ष सुरु केला होता. गेल्या महिन्यात देखील बांगलादेश मध्ये याच मुद्यावरुन संघर्ष निर्माण झाला होता. काल पुन्हा एकदा आरक्षण रद्द करण्यासाठी संघर्ष झाला होता. गेल्या दोन दिवसात 300 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळं येत्या ऑक्टोबर महिन्यात महिला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (Women's T20 World Cup 2024) स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
बांगलादेशमधील महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेवर प्रश्नचिन्ह
बांगलादेशमध्ये ढाका विद्यापीठातील आरक्षण विरोधी आंदोलनाचा प्रभाव वाढल्यानं शेख हसीना यांना अखेर पंतप्रधानापदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. सध्या बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळं महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरक्षितपणे कशी पार पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयसीसीकडून परिस्थितीवर नजर
बांगलादेशमध्ये जुलै महिन्यापासून सुरु असलेल्या घडामोडींची दखल आयसीसीनं घेतली आहे. गेल्या महिन्यात कोलंबोत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बांगलादेशमध्ये टी 20 वर्ल्ड कपचं आयोजनाबाबत चर्चा झाली होती. आयसीसीनं बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवर नजर असल्याची माहिती कोलंबोतील बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.
आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये होणार आहे. ही स्पर्धा 18 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या वर्ल्डकपमध्ये एकूण 23 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. ढाका आणि आणखी एका शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे.
महिला टी 20 वर्ल्डकपचं वेळापत्रक मे महिन्यात जाहीर करण्यात आलेलं आहे. महिला टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद सध्या ऑस्ट्रेलियाकडे आहे. याशिवाय भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा सप्टेंबर महिन्यात करणार आहे. या दौऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी देशात लवकरच अंतरिम सरकार स्थापन करणार असून नागरिकांनी शांतता बाळगावी, असं आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या: