Experts Opinion On IND vs AUS Final : रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही तासात मिळणार आहे..वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. त्याआधी अनेक दिग्गजांनी आजचा सामना कोण जिंकणार याचे भाकित केलेय.  ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याच्यामते आजच्या सामन्यात टीम इंडिया फेव्हरेट आहे. भारतीय संघ भन्नाट फॉर्मात आहे. ते चॅम्पियनसारखे खेळले आहेत. आजच्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड आहे.  


या दिग्गजांच्या मते टीम इंडिया विश्वचषक उंचावणार!


वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू इयन बिशप यांच्यामते टीम इंडिया आज विश्वचषक उंचावणार आहे. विश्वचषकात भारतीय फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅरॉन फिंच याच्या मते आजच्या सामन्यात टीम इंडिया फेव्हरेट आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने शानदार खेळ केला आहे.  माझे हृदय ऑस्ट्रेलिया जिंकेल असे म्हणतेय, पण माझे मन भारत जगज्जेता होईल असे सांगतेय.


इम्रान ताहिर, गौतम गंभीर, इरफान पठान आणि सौरव गांगुली काय म्हणाले?


दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यानेही टीम इंडिया फेव्हरेट असल्याचे म्हटले. तर गौतम गंभीर म्हणाला की, भारतीय संघाला जास्त फायदा मिळणार आहे. टीम इंडिया ज्यापद्धतीने खेळत आहे, ते कौतुकास्पद आहे. त्याशिवाय इरफान पठाण आणि सौरव गांगुली यांच्या मतेही विश्वचषकाच्या फायनल सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह वॉ याच्या मते, पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिचा संघ विश्वचषकावर नाव कोरेल. 


दरम्यान, विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे.