IND vs AUS Final World Cup 2023 : विश्वचषक 2023 (ICC ODI World Cup 2023) मधील दोन सर्वोत्तम संघ भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) आज अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) भारत (Team India) एकमेव अपराजित संघ आहे. टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्व 10 सामने जिंकले आहेत तर, ऑस्ट्रेलियाने सलग दोन पराभवांसह सुरुवात केली असली तर, त्यानंतर स्पर्धेत जोरदार कमबॅक करत सर्व सामने जिंकले आहेत.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेगाफायनल


एक संघ म्हणून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. 12 वर्षांनंतर भारत विश्वविजेता होण्याचा प्रबळ दावेदार आहे. त्यासोबत 2003 च्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढण्याची टीम इंडियाला तब्बल दोन दशकांनतर संधी मिळाली आहे. 20 वर्षांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.


टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यास सज्ज


टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. पण वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात पाऊस पडला तर फायनलची मजाच किरकिरी होईल. अंतिम सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. जर पावसामुळे आज सामना पूर्ण होऊ शकला नाही तर काय होईल जाणून घ्या.


पाऊस पडला तर काय होईल?


आज अहमदाबादमध्ये रविवारी हवामान स्वच्छ राहील. पण पाऊस पडला तर? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात येऊ शकतो. पावसामुळे सामना पूर्णपणे वाहून गेला तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. आयसीसीने फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. जेव्हा सामना 20-20 षटकांचा खेळला जाऊ शकत नाही तेव्हा राखीव दिवस लागू केला जातो. मात्र, पंच पहिल्याच दिवशी सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.


भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ विजेते?


आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकाचा अंतिम सामना नियोजित तारखेला होऊ शकला नाही तर, तो राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्णपणे रद्द झाला, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जातं. 2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात हे दिसून आलं. भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या 48 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत एकही अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला गेलेला नाही.


अहमदाबादमध्ये हवामान कसं असेल?


दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम सामन्याचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. रविवारी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नाही. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी हलका सूर्यप्रकाश असेल आणि त्यानंतर तापमानात घट होईल. दिवसाचे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IND vs AUS : मेगाफायनलसाठी अंपायर्सचं मेगा पॅनल तयार, टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं एक नाव; 'या' अंपायरमुळे धाकधूक वाढली