INDW vs SAW Test : वनडे मालिकेत भारतीय महिलाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 3-0 ने धुव्वा उडवला होता. आता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार सुरुवात केली आहे. भारताच्या शेफाली वर्माने (Shafali Verma) द्विशतक ठोकत नवा विक्रम केला आहे. महिला क्रिकेटमध्ये शेफाली वर्माने सर्वात वेगवान द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. शेफाली वर्माने 197 चेंडूमध्ये 205 धावांची खेळी केली. शेफाली वर्माने स्मृती मंधानासोबत (Smriti Mandhana) 292 धावांची सलामीला भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी चार विकेटच्या मोबदल्यात 525 धावांचा डोंगर उभारलाय. 


सर्वात वेगवान द्विशतक


 महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान द्विशतकाचा विक्रम आता भारताच्या शेफाली वर्माच्या नावावर जमा झाला आहे. शेफाली वर्माने 194 चेंडूत द्विशतक ठोकले. तिच्या आधी सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेलच्या नावावर होता. ॲनाबेलने फेब्रुवारी 2024 मध्ये 256 चेंडूत द्विशतक पूर्ण करून विक्रम केला होता. पण अवघ्या 5 महिन्यांनंतर शेफालीने हा विक्रम उद्ध्वस्त केला. ॲनाबेलपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनने 313 चेंडूत द्विशतक झळकावले होते.


दोन षटकार ठोकत पूर्ण केले द्विशतक


दक्षिण आफ्रिकाविरोधात एकेकाळी शेफाली वर्मा 191 चेंडूत 187 धावा करून खेळत होती. डावाच्या 73 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेसाठी डेल्मी टकर गोलंदाजी करायला आली. शेफाली वर्माने पहिल्या दोन चेंडूवर दमदार षटकार ठोकला.   त्यानंतर षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत 194 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. शेफालीला पाहून क्रिकेटप्रेमींना वीरेंद्र सेहवागची ती खेळी आठवली असेल. 2004 मध्ये सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात षटकार ठोकून त्रिशतक पूर्ण केले होते.


मिताली राजचा रेकॉर्ड कायम -


महिला कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणारी मिताली राज पहिली खेळाडू ठरली होती. मितालीने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 214 धावांची खेळी केली होती. मितालीने त्या डावात 19 चौकार मारले होते.  शेफालीनेही 23 चौकार आणि 8 षटकार ठोकत द्विशतक ठोकले.  पण शेफाली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होऊ शकली नाही. तिने 215 धावा केल्या असत्या तर तिने मिताली राजला मागे सोडले असते. आता कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारी ती भारतीय खेळाडू बनली असती. पण हा रेकॉर्ड कायम राहिलाय.