एका दशकाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर कांगारूंनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 वर कब्जा केला. कसोटी मालिकेत 3-1 असा पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियावर जोरदार टीका होत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावरही प्रश्नचिन्ह आहेत. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे प्लेईंग इलेव्हन बदलत राहिले, पण एक खेळाडू असा होता जो 5 सामन्यात फक्त पाणी देत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2024 मध्ये अनेक स्टार खेळाडू कसोटीत संघर्ष करताना दिसले असताना या खेळाडूने वर्षभर धावा केल्या.


तो दुसरा तिसरा कोणी नसून सरफराज खान आहे. ज्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात स्थान मिळाले होते, पण एकाही कसोटीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे संघ व्यवस्थापनाने देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्यावर विश्वास व्यक्त केला, मात्र सतत धावा करत असतानाही सरफराजकडे दुर्लक्ष करण्यात आले.


सरफराजकडे दुर्लक्ष 


सरफराज खान फॉर्मात नव्हता असे नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उर्वरित भारतीय फलंदाज शरणागती पत्करत असताना, सरफराजने बंगळुरूमध्ये शानदार शतक झळकावले. यापूर्वी इराणी चषक 2024 मध्ये मुंबईकडून खेळताना त्याने द्विशतकही झळकावले होते. 2024 मध्ये सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळला होता आणि त्यामुळेच त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.


संजय मांजरेकर यांनी उपस्थित केला प्रश्न 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सरफराज खानकडे दुर्लक्ष केल्याबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी टीम इंडिया व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोवर आपले मत देताना तो म्हणाला की, सरफराज खानला देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. त्याने भारतासाठी 3 अर्धशतके आणि 150 धावांची खेळी खेळली. पुढच्या काही सामन्यांमध्ये तो नक्कीच फ्लॉप झाला, पण ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले, जे योग्य नाही. 






सरफराज खानची कारकीर्द


मुंबईचा फलंदाज सरफराज खानला 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने भारतासाठी आतापर्यंत 6 सामने खेळले असून 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. सरफराजने या कालावधीत 3 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.


हे ही वाचा -


Yuzvendra Chahal Video Viral : उत्साहाचा झरा असल्यासारखा हसतखेळत वावरणाऱ्या युजवेंद्र चहलची अवस्था पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, VIDEO व्हायरल