Sanju Samson : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील अखेरचा आणि निर्णायक सामना ब्रायन लारा स्टेडिअममध्ये झाला. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली.  भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाचे सलामीवीर ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 19.4 षटकांत 143 धावा जोडल्या. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराज गायकवाड याने निराश केला. त्यानंतर संजूने मिळालेल्या संधीचं सोनं केले. संजू सॅमसन याने दमदार अर्धशतकी खेळी केली.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. पण या फलंदाजाने निराशा केली, तो स्वस्तात बाद झाला. मात्र, तिसऱ्या वनडेत मिळालेल्या संधीचा संजू सॅमसनने पुरेपूर फायदा उठवला. या सामन्यात संजू सॅमसनने 41 चेंडूत 51 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. यानंतर संजू सॅमसन सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. संजू सॅमसनच्या खेळीचं कौतुक केले जातेय. दुसऱ्या सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर सॅमसन याच्यावर टीका होत होती, पण दुसऱ्या सामन्यात वादळी खेळी करत संजूने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.






वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. संजूला बेंचवरच बसवण्यात आले होते. पण त्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयवर जोरदार टीका केली. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसन याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले. पण संजू सॅमसनने त्याच्या चाहत्यांची निराशा केली. संजू सॅमसन याला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. त्याला दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नव्हती. आता तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतक झळकावून संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर संजू सॅमसन आपली जागा राखण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण संजू सॅमसनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक करून नंबर-4 साठी जोरदार दावा मांडला आहे यात शंका नाही. आगामी विश्वचषक स्पर्धेत संजू सॅमसन याने आपली दावेदारी पेश केली आहे. या स्थानासाठी भारतीय संघ वेगवेगळ्या फलंदाजाची चाचपणी करत आहे. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघ त्याची रिप्लेसमेंट शोधत आहे. आशिया चषकात संजू सॅमसन याला संधी मिळते का ? याकडेही चाहत्यांचे लक्ष लागलेय.