Sandeep Lamichhane Rape Case : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या आधी नेपाळ क्रिकट संघासाठी खूशखबर मिळाली आहे. 23 वर्षीय फिरकी गोलंदाज संदीप लामिछाने याची बलात्कार प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली.  जानेवारी 2024 मध्ये संदीप याला कोर्टाकडून आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण आता त्याला निर्दोष सोडण्यात आलेय. त्यामुळे आगामी टी20 विश्वचषकात तो नेपाळ संघाकडून खेळू शकतो. दरम्यान, नेपाळ क्रिकेट बोर्डानं टी20 विश्वचषकासाठी याआधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. 25 मे पर्यंत ताफ्यात बदल करण्याची संधी आहे. 


संदीप लामिछाने याच्यावर काठमांडू येथील एका हॉटेलच्या खोलीत 17 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. जानेवारी 2024 मध्ये त्याला आठ वर्षांची शिक्षा आणि तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. संदीपला आता निर्दोष सोडण्यात आलेय .


आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी होती?
23 वर्षीय संदीपने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 51 एकदिवसीय आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 द्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांच्या 50 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 18.07 च्या सरासरीने 112 विकेट्स घेतल्या आहेत आणि 35 डावांमध्ये फलंदाजी करताना 376 धावा केल्या आहेत. याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 52 डावांमध्ये त्याने 12.58 च्या सरासरीने 98 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करताना 19 डावात 64 धावा केल्या.


आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा एकमेव क्रिकेटपटू
संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलाय. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.


सतराव्या वर्षी आयपीएल खेळण्याची संधी
 संदीप लामिछानेनं 17 व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता.  दिल्लीच्या संघानं 2018 मध्ये संदीप लामिछानला 20 लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी 44 टी-20 सामन्यात 85 विकेट्स घेतल्या आहेत.