Team India: टी-20 विश्वचषकाचं विजेतेपद आणि झिम्बॉब्वे विरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ (Team India Sri Lanka Tour) आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. या मालिकेपासून भारताचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) कार्यकाळ सुरु होणार आहे. सुरुवातीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) वन-डे मालिकेत खेळताना दिसणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, गंभीरच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होत असल्यानं दोघांनी देखील वनडे मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं. त्यामुळं रोहित शर्माची वनडे टीमचा कर्णधार म्हणून निवड झाली, तर सूर्यकुमार यादवची टी-20 संघाच्या कर्णधार म्हणून वर्णी लागली.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची निवड झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या दिवसांपासून अनेक नावं समोर येत आहे. मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आज किंवा उद्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याने या दौऱ्यासाठी एका मराठमोळ्या प्रशिक्षकाची निवड केली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मोर्केल याचं नाव चर्चेत होते. पण यावर अजुनही काही निर्णय झाला नसल्याने बीसीसीआयने तात्पुरती व्यवस्था केली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी साईराज बहुतुले यांची निवड केली आहे.
कोण आहेत साईराज बहुतुले?
साईराज बहुतुले यांनी दोन कसोटी सामने आणि आठ वनडे सामने खेळले आहेत. साईराज बहुतुले हे अष्टपैलू खेळाडू होते, मुंबईमधील क्रिकेट ग्राऊंडवर त्यांनी क्रिकेटचे धडे घेतले. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबतही ते खेळलेत. आयपीएलमध्येही त्यांनी मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. बहुतुले यांनी भारतासाठी 2 कसोटी आणि 8 वन-डे सामने खेळले आहेत. 188 प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी 630 विकेट्स घेतल्या आहेत, तर 143 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 197 विकेट्स घेतल्या आहेत.
मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा पहिला दौरा-
टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची (Gautam Gambhir) नियुक्ती करण्यात आली. आगामी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वन-डे मालिका गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली मालिका असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी अशा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यांची कदाचित कोणालाच अपेक्षा नव्हती.
कसा असेल टीम इंडियाचा श्रीलंका दौरा-
टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै
एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक
पहिली मॅच :2 ऑगस्ट
दुसरी मॅच : 4 ऑगस्ट
तिसरी मॅच : 7 ऑगस्ट