मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेटचं मैदान गाजवून निवृत्त झाला आहे. पण आता तो सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टिव्ह असून अनेक पोस्ट शेअर करत असतो. या पोस्टमध्ये तो अनेक किस्से किंवा वेगवेगळे विचारही शेअर करत असतो. नुकताच शेअर केलेल्या एका किस्स्यामधून सचिनने वाहतूक पोलिसांचं कौतुक करत त्यांना एकप्रकारे सलाम ठोकला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनच्या एका निकटवर्तीय व्यक्तीचा जीव कसा एका वाहतूक पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचला हे यामध्ये सांगितलं आहे.


काय आहे किस्सा? 


सचिनने फेसबुकवरुन शेअर केलेल्या किस्स्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, 'काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रीणीचा भीषण अपघात झाला. देवाच्या कृपेने ती आता बरी आहे. मात्र, त्यावेळी एका वाहतूक पोलिसाने केलेल्या मदतीमुळेच ती आता बरी आहे. अपघातानंतर त्याने ताबडतोब प्रसंगावधा दाखवत तिला ताबडतोब ऑटोमध्‍ये बसवत रुग्णालयात नेले. ज्यानंतर मी स्वत: जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले. त्यांच्यासारखे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत, जे कर्तव्याच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करतात. अशा लोकांमुळेच जग सुंदर आहे. जेव्हा तुम्ही अशा लोकांना, विशेषत: जनतेची सेवा करणाऱ्यांना भेटता तेव्हा आवर्जून त्यांचे आभार मानायला थोडा वेळ द्या. आपल्याला कदाचित माहित नसेल, पण असे अनेकजण कोणताही गाजावाजा न करता आपली मदत करत असतात आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण भारतातील वाहतूक पोलिसांसाठी, लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण एकमेंकासाठी वाहतूक नियमांचा आदर करूया आणि शॉर्टकट नको वापरुया. कारण दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्वत:चा थोडा वेळ वाचवणे योग्य नाही. 


सचिन तेंडुलकरची फेसबुक पोस्ट-




पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस


सचिन तेंडुलकरनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर अनेक नेटकरी कमेंट्स करत असून अनेकांनी पोस्ट लाईकही केली आहे. 22 तासानंतर 28 हजारांहून अधिकांनी पोस्ट लाईक केली आहे. तर 400 हून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर करत त्यावर कमेंटही केली आहे. सचिनने ही पोस्ट शेअर केल्यामुळे अनेकांनी वाहतूक पोलिसांसह सचिनचंही कौतुक केलं आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha