Saba Karim Statement on Suryakumar Yadav Team India: श्रीलंकेविरुद्धच्या (Shri Lanka) शनिवारी रंगलेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सूर्या नावाचं वादळ मैदानात उतरलं आणि त्यानं श्रीलंकेच्या गोलंदाजांना चारी मुंड्या चीत केलं. सूर्यानं श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 112 धावांची धमाकेदार खेळी खेळली. त्याच्या याच खेळीमुळे भारतानं हा सामना 91 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशा फरकानं खिशात घातली. टी-20 नंतर आता टीम इंडिया श्रीलंकेसोबत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उद्या मंगळवारी, म्हणजेच 10 जानेवारीपासून टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.


श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका टीम इंडियानं जिंकल्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत होता. पण एवढ्यावरच थांबून चालणारं नाही. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव वगळता एकाही आघाडीच्या फलंदाजाला तेवढं योगदान देता आलेलं  नाही. त्याचबरोबर गोलंदाजीतही काही खेळाडूंची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आता टीम इंडियाची माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य सबा करीमनं टीम इंडियाला इशाराच दिला आहे. टी-20 मध्ये यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) फलंदाजीवर जास्त अवलंबून राहू शकत नाही, असं सबा करीमनं स्पष्ट केलं आहे. सबा करीमच्या या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. 


सबा करीम (Saba Karim) असं का म्हटलंय? असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे. त्यावर सबा करीमनं स्पष्टीकरण दिलं आहे. सबा करीमने भारतीय फलंदाजांना एकजुटीनं कामगिरी करण्याचं आवाहन केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सबा करीम म्हणाला की, "टीम इंडिया सूर्यकुमार यादववर जास्त अवलंबून राहू शकत नाही. आणि जर असं झालंच तर ते आगामी सामन्यांमध्ये संघासाठी त्रासदायक ठरणार आहे. इतर फलंदाजांनीही सूर्यकुमारप्रमाणेच आपलं योगदान द्यावं अशी माझी इच्छा आहे. सूर्यकुमार वगळता बाकीच्या फलंदाजांनी थोडेफारचं योगदान दिलं असलं तरी त्यांची कामगिरी म्हणजे, सामना जिंकणारी कामगिरी आहे, असं म्हणता येणार नाही."


साबा करीम पुढे बोलताना म्हणाला की, राहुल त्रिपाठीला T20 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर अधिक संधी मिळायला हव्यात. करीमचा असा विश्वास होता की, राहुल त्रिपाठीनं इंडियन प्रीमियर लीगमध्येही त्याच क्रमांकावर फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं टीम इंडियासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल. आयपीएलमध्ये त्यानं याच क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोत्तम स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत.  टीम इंडियातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांना अशाच कामगिरीची गरज आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. सूर्यानं तीन सामन्यांमध्ये 85.00 च्या उत्कृष्ट सरासरीनं आणि 175.25 च्या स्ट्राइक रेटनं 170 धावा केल्या. यादरम्यान त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं. अक्षर पटेल 117 धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांशिवाय या मालिकेत एकाही भारतीय फलंदाजाला 60 धावाही करता आलेल्या नाहीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Suryakumar Yadav: तीन देश, 3 शतकं अन् विक्रमांची मालिका... सूर्या नावाचं वादळ फॉर्मात