World Test Championship Final: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची शर्यत रंजक झाली आहे.  पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेविरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-0नं जिंकली. मात्र, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शर्यत रंजक बनली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलिया 75.56 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारताचे 58.93 टक्के गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध WTC फायनल कोण खेळणार?

यासोबतच श्रीलंकेचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंका संघाचे 53.33 टक्के गुण आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाकडून मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान असणार आहे. 

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर होणार स्पष्ट

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला तर तो जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचेल, पण जर टीम इंडिया हरली तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-2 अशी बरोबरीत राहिली, तर अशा स्थितीत देखील टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 10 1 4 136 75.56
2. भारत 8 4 2 99 58.93
3. श्रीलंका 5 4 1 64 53.33
4. दक्षिण आफ्रीका 6 6 1 76 48.72
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 4 64 38.10
8. न्यूझीलंड 2 6 3 36 27.27
9. बांगलादेश 1 10 1 16 11.11