Ross Taylor about Rajsthan Royals Owner : न्यूझीलंड संघाचा (New Zealand) माजी कर्णधार रॉस टेलर (Ross Taylor) याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL) बरेच सामने खेळले. पण राजस्थान रॉयल्स संघाकडून 2011 साली खेळताना त्याच्यासोबत घडलेला एक धक्कादायक खुलासा त्याने नुकताच सर्वांसोबत शेअर केला. राजस्थान रॉयल्सच्या एका मालकाने रॉस एका सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला 3 ते 4 वेळा कानशिलात लगावल्याचा धक्कादायक खुलासा रॉसने केला आहे. रॉस टेलरने नुकतेच त्याचे ब्लॅक अँड व्हाईट हे आत्मचरित्र लिहिलं त्यामध्ये त्याने हा खुलासा केला आहे.
रॉस टेलरने याबद्दल सांगितले की, ''आयपीएल खेळताना असं काही माझ्यासोबत घडेल असा मी विचारही केला नव्हता. 2011 साली मोहाली येथे एका सामन्यादरम्यान मी शून्य धावा करुन बाद झालो. त्यानंतर एका राजस्थान रॉयल्सच्या मालकाने मला 3 ते 4 वेळा कानाखाली लगावली. ही कानशिलात जोरात नव्हती, कदाचित त्यांनी मस्करीत मारलं असेल पण हे करताना आम्ही तुला इतके हजारो डॉलर्स शून्यावर बाद होण्यासाठी देत नाही असंही म्हटलं होतं. त्यामुळे आयपीएलसारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर खेळताना अशाप्रकारच्या वागणूकीचा विचार करत नाही.'' रॉसने यावेळी बोलताना न्यूझीलंडच्या क्रिकेटरुममध्येही वर्णभेदाचा अनेकदा सामना करावं लागल्याचा खुलासा देखील केला आहे.
रॉस टेलरचं 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
रॉस टेलरनं 2006 मध्ये न्यूझीलंडकडून पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याची संधी मिळाली. टेलरनं 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,593 धावा आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,909 धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यानं 7,683 धावा केल्या आहेत. ज्यात 19 शतकाचा समावेश आहे.
शेवटच्या सामन्यात रॉस टेलर 14 धावांवर बाद
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात त्याला क्रीजवर येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांच्या भागीदारीमुळं त्याला 39व्या षटकात क्रीझवर यावं लागलं. तो मैदानातच येताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केलं. 14 धावांवर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.
हे देखील वाचा-