Rohit Sharma vs Australia ODI Series : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला 1-2 अशी पराभवाचा सामना करावा लागला, मात्र तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने शानदार पुनरागमन करत 9 विकेटने विजय मिळवला. या निर्णायक सामन्यात हर्षित राणाच्या भेदक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाची टीम पहिल्याच डावात 236 धावांवर गारद झाली. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने दमदार विजय मिळवला.
रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी
कंगारूंच्या गोलंदाजांवर रोहित शर्माने अक्षरशः तुटून पडला. दुसऱ्या सामन्यात शतकाची संधी गमावलेल्या रोहितने सिडनीतील तिसऱ्या सामन्यात मात्र कोणतीही चूक न करता आपली खास शैली दाखवली. त्याने 125 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 121 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याला विराट कोहलीने उत्तम साथ दिली. विराटने 81 चेंडूंवर 7 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 74 धावा केल्या. रोहित शर्माच्या या अप्रतिम खेळीसाठी त्याला सामनावीर (Player of the Match) पुरस्कार मिळाला. त्यामुळे टीम इंडिया मालिका हरली, पण रोहित शर्मा एक ट्रॉफी जिंकली.
मालिकावीर ठरला रोहित शर्मा
तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 3 सामन्यांत 101.00 च्या सरासरीने 202 धावा ठोकल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने 21 चौकार आणि 5 षटकार लगावले. 121 धावांचा त्याचा सर्वोत्तम खेळ ठरला आणि त्याला मालिकावीर (Player of the Series) हा किताब मिळाला.
रोहित-विराटने का म्हटलं “अलविदा”?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आधीच टेस्ट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता हे दोघेही फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील हा दौरा त्यांचा शेवटचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या सामन्यानंतर विजय मिळवून रोहित आणि विराटने मैदानावर उपस्थित ऑस्ट्रेलियन चाहत्यांचे विशेष आभार मानले.
पुढील भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सीरीज कधी?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2027 विश्वचषकापूर्वी कोणतीही वनडे मालिका नियोजित नाही. टीम इंडियाचे पुढील काही वर्षांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे 2027 चा वनडे विश्वचषक खेळल्यानंतर निवृत्ती घेतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे दोघांचेही ऑस्ट्रेलियातील पुढील वनडे दौऱ्यावर जाणे फारसे शक्य दिसत नाही.
हे ही वाचा -