Ind vs Ban: पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा (Ind vs Ban) 280 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. 


रोहित शर्मा (Rohit Sharma) हा एक शांत कर्णधार वाटत असला तरी त्याच्यामध्ये एक खोडकर मुलगा दडलेला आहे. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. रोहित शर्मा मैदानाच्या आत असो की बाहेर, त्याची मजेशीर शैली नेहमीच पाहायला मिळते. कधी त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड होतो, तर कधी त्याच्या काही मजेदार कृती कॅमेऱ्यात कैद होतात. यावेळीही असेच काहीसे घडले. रोहित शर्माचे एक मजेदार कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.


व्हिडीओमध्ये नेमकं काय?


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, प्रशिक्षक गौतम गंभीर हे ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. भारताची फलंदाजी सुरु होती. यावेळी रोहित शर्मा शुभमन गिलला काहीतरी सांगत होता. दोघांची मस्ती सुरु असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचदरम्यान कॅमेरा रोहित शर्माकडे असतो आणि विराट कोहली रोहितला सांगतो की 'भाई, कॅमेरा इधर है'...कोहली बोलताच रोहित बघतो आणि काहीतरी बोलत पुढे बसलेल्या गौतम गंभीरच्या मागे लपतो. हे बघता ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या सर्वांना हसू अनावर होते. 






भारतीय संघाचा विजय-


सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 376/10 धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 133 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी 47.1 षटकांत 149 धावांत गुंडाळले. या काळात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 4 बळी घेतले. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आणि 287/4 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान शुभमन गिलने 176 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 128 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. डाव घोषित केल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ 234 धावा करता आल्या.


संबंधित बातमी:


वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo