IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने कायम ठेवण्याचे नियमही जाहीर केले आहेत. या महिन्याच्या अखेरीस कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली जातील, असे मानले जात आहे. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 6 खेळाडू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा स्थितीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 5 विजेतेपद पटकावणारा रोहित शर्मा पुढील हंगामात या संघासोबत राहणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने रोहितबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्मा रिलीज झाला तर तो लिलावात दिसणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार, रोहित लिलावात आला तर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यासाठी मोठी बोली लावू शकतात. हे दोन्ही खेळाडू लिलावात नव्या कर्णधाराच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे.
एका चाहत्याने अश्विनला त्याच्या यूट्यूब चॅनलवर विराट कोहली आणि रोहित शर्मा एकाच संघात खेळण्याबद्दल विचारले होते. याला उत्तर देताना अश्विन म्हणाला की, जर आरसीबीला रोहितचा संघात समावेश करायचा असेल तर त्यांना रोहित शर्मासोबत 20 कोटींची डील करावी लागेल. रविचंद्रन अश्विन म्हणाला, 'जर तुम्ही रोहित शर्मासाठी जात असाल तर तुम्हाला 20 कोटी रुपये ठेवावे लागतील. 20 कोटी तिथे गायब होतील.
रोहित शर्मावर लागणार मोठी बोली
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आरसीबीकडून खेळत आहे. त्यामुळे आयपीएल रिटेन्शनच्या नियमांमध्ये एक गोष्ट निश्चित मानली जाते की आरसीबी विराट कोहलीला पहिला रिटेन्शन पर्याय म्हणून ठेवेल. जर RCB रोहितला करारबद्ध करण्यात यशस्वी ठरले, तर क्रिकेट चाहत्यांना रोहित आणि कोहली ही चमकदार सलामी जोडी आरसीबीसाठी एकत्र सलामी देताना दिसेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पाच वेळा आयपीएल विजेते ठरले आहे. मात्र, लिलावात रोहितला कायम ठेवणार की नाही याबाबत मुंबईकडून अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. जरी रोहितला मुंबई इंडियन्सने कायम ठेवले नसले तरी फ्रँचायझी त्याला RTM कार्डद्वारे परत मिळवू शकते.
नियमांनुसार, प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त 6 खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे, त्यापैकी एक अनकॅप्ड खेळाडू असेल. फ्रँचायझी जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना ठेवू शकते. सर्व फ्रँचायझींसाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे.