ND vs NZ, World Cup 2023, Rohit Sharma vs Trent Boult: धरमशालाच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या टेबल टॉपवर संघामध्ये लढत सुरु आहे. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला, कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत भन्नाट फॉर्मात आहे. तिन्हीही सामन्यात रोहित शर्माने वादळी सुरुवात करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. 66 च्या सरासरीने आणि 137 च्या स्ट्राईकरेटने रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला आहे. आज होणाऱ्या सामन्यातही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. किवीविरोधात रोहित शर्माला वादळी सुरुवात करणं सोप्पं नाही. कारण डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा आहे.
न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याच्यापुढे रोहित शर्माची बॅट नेहमीच शांत राहते. बोल्टच्या स्विंगपुढे रोहित शर्माची बॅट चालत नाही. रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांच्यामध्ये आतापर्यंत 13 वेळा आमना सामना झाला आहे. यामध्ये बोल्टचे पारडे जड राहिलेय. बोल्टने रोहित शर्माला आतापर्यंत 137 चेंडू टाकले आहेत. त्यावर रोहित शर्माला 89 धावा करता आल्या आहेत. इतकेच काय, ट्रेंट बोल्ट याच्याविरोधात हिटमॅन रोहित शर्मा याला एकही षटकार मारता आलेला नाही.
13 सामन्यात ट्रेंट बोल्ट याच्यासमोर रोहित शर्मा याला फक्त 64.96 च्या स्ट्राईक रेटने धावा करता आल्यात. रोहित शर्माची सरासरीही फक्त 22 इतकीच आहे. ट्रेंट बोल्ट याने रोहित शर्माला आतापर्यंत चार वेळा तंबूत पाठवलेय.
धर्मशालाची खेळपट्टी बोल्टला मदत करणारी
धरमशाला मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्याशिवाय चेंडूही मोठ्या प्रमाणात स्विंग होऊ शकतो. या मैदानावर ट्रेंट बोल्ट याला मदत मिळणार आहे. बोल्टने सामन्यापूर्वीही खेळपट्टी गोलंदाजीसाठी चांगली असल्याचे म्हटलेय. अशा स्थितीत बोल्टच्या स्विंग माऱ्यापुढे रोहित शर्माला धावा काढणं सोपं नसेल. त्यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजापुढे रोहित शर्माची बॅट शांतच राहते. विश्वचषकात बोल्ट भन्नाट फॉर्मात आहे. 4 सामन्यात फक्त 4 च्या इकॉनमीने तो गोलंदाजी करत आहे. यामध्ये पाच विकेटही घेतल्या आहेत. रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांचा सामना पाहण्यासारखा असेल.
न्यूझीलंडविरोधात रोहितची कामगिरी कशी ?
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या शानदार लयीत आहे. पहिल्या चेंडूपासूनच रोहित शर्मा प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडतो. रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात टॉपवर आहे. दिल्लीमध्ये अफगाणिस्तानविरोधात शतक ठोकले होते. तर पाकिस्तानविरोधात 86 धावा चोपल्या आहेत. बांगलादेशविरोधातही 48 धावांचे योगदान दिले होते. आता रोहित शर्मा न्यूझीलंडची गोलंदाजी फोडण्यास तयार झाला आहे. न्यूझीलंडविरोधात रोहित शर्माने 27 वनडे सामन्यात 889 धावा चोपल्या आहेत. त्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आजही रोहित शर्माकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल.