IND vs NZ Match Prediction : विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामना आज होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज धरमशालाच्या मैदानात रंगतदार सामना होणार, यात शंकाच नाही. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत आघाडीवर राहणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाने आतापर्यंत आपले चार चार सामने जिंकले आहेत. मागील 33 वर्षांतील आयसीसी स्पर्धेचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंडचे पारडे जड आहे. पण टीम इंडिया सध्या भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे सामना रोमांचक होईल. 


आकडे भारताच्या बाजूने?


वनडे क्रिकेटमधील ओव्हरऑल हेड टू हेड आकडे भारताच्या बाजूने आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 58 तर न्यूझीलंड संघाने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या आयसीसी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडाचा संघ पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. 2023 च्या सुरुवातीला दोन्ही संघामध्ये तीन सामन्याची मालिका झाली होती, त्यामध्ये भारताने एकतर्फी विजय मिळवला.


टीम इंडियाची ताकद काय  ?


फलंदाजी ही टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद आहे. भारतीय संघाचे आघाडीचे पाचही फलंदाज सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. रोहित शर्मा वादळी सुरुवात करतोय. तर विराट कोहलीची बॅटही तळपतेय. शुभमन गिल यंदा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुलही लयीत दिसत आहे. त्यामुळे फलंदाजी पुन्हा एकदा टीम इंडियाची ताकद आहे. तळाला सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जाडेजा धावांचा पाऊस पडण्यात तरबेज आहेत. 


भारताच्या गोलंदाजीत किती दम ?


जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत भारतीय गोलंदाजीची ताकद वाढली आहे. भारतीय गोलंदाजी आक्रमक जिसत आहे. सिराज नंबर एक चा गोलंदाज आहे. फिरकीमध्ये रविंद्र जाडेजा आणि कुलदीप आपले सर्वोत्तम योगदान देत आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत चार सामन्यात एकाही संघाला 275 पेक्षा पुढे जाऊ दिलेले नाही. टीम इंडियाची गोलंदाजी संतुलीत आहे. 


न्यूझीलंडची ताकद काय ?


गोलंदाजी हा किवीचा मजबूत पक्ष आहे.. मॅट हेनरी आणि ट्रेंट बोल्ट या जोडीने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना ध्वस्त केले आहे. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्यात तरबेज आहेत. त्याशिवाय मिचेल सँटनरसारखा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे, त्याच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक विकेटची नोंद आहे. 


न्यूझीलंडच्या फंलदाजीत किती दम ?
न्यूझीलंड संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत, या प्रत्येक सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धावा चोपल्या आहेत. पण फलंदाजीमध्ये अनियमितता दिसत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ही कमजोरी पकडावी लागेल. न्यूझीलंडचे फलंदाज संयम सोडत नाहीत, चिवटपणे आपले काम करतात, हेही तितेकच महत्वाचे आहे. आज होणारा सामना रंगतदार होईल, यात शंकाच नाही. 


आज कोण सामना जिंकणार ?
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सध्या शानदार फॉर्मात आहेत. दोन्ही संघाने आतापर्तंयचे सर्व सामने एकतर्फी जिंकले आहेत. दोन्ही संघ संतुलीत आहेत त्यामुळे आताच कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण आहे. जो संघ मैदानात सर्वोत्तम कामगिरी करेल, तोच विजयी होईल.  आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.