नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आयपीएलनंतर (IPL) इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका (Test Series) खेळणार आहे. राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी रोहित शर्माला (Rohit Sharma) कसोटी संघाच्या कर्णधार पदावरुन दूर करण्यचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. रोहित शर्माला कसोटी संघात सलामीवीर म्हणून स्थान दिलं जाईल. बीसीसीआयचा देखील निवड समितीच्या सदस्यांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचं वृत्त आहे.
रोहित शर्मानं गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहता हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यामुळं रोहित शर्माकडे एकदिवसीय संघाचं नेतृत्व राहू शकतं.रोहित शर्मा यापुढं वनडे क्रिकेटला प्राधान्य देऊ शकतो, असं समजतंय.
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर इंग्लंड दौऱ्यात नेतृत्व करेल अशी बीसीसीआयचा प्राथमिक अंदाज होता. रोहित शर्मानं मायकल क्लार्कला दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह इंग्लंडवर आक्रमण करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, गेल्या महिन्यात निवड समितीच्या सदस्यांनी रोहित शर्माच्या भारतीय कसोटी संघातील स्थानावर चर्चा केली.
निवड समितीचे विचार स्पष्ट असून, इंग्लड दौऱ्यासाठी त्यांना नवा कर्णधार हवा आहे, रोहित शर्मा कर्णधार म्हणून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटीत नेतृत्व करण्यास फिट नसल्याचं निवड समितीचं मत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढच्या राऊंडसाठी निवड समितीचा विचार नव्या नेतृत्त्वाला विकसित करणं हा आहे. निवड समितीनं रोहितनं संघाचं नेतृत्व करु नये असं बीसीसीआयला कळवल्याची माहिती बोर्डातील सूत्रानं दिल्याचं एक्स्प्रेसनं छापलं आहे.
निवड समितीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जी अस्थिरता दिसून आली होती ती नको आहे. रोहित शर्माला त्या मालिकेत संघर्ष करावा लागला होता.पाच डावांमध्ये त्यानं 6.20 च्या सरासरीनं फलंदाजी केली होती. शेवटच्या कसोटीत रोहित शर्मा स्वत: संघाबाहेर बसला होता. याशिवाय न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मानं तीन कसोटी सामन्यांमध्ये 15.16 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माच्या फॉर्ममुळं निवड समिती त्याला कर्णधार करण्याच्या निर्णयाच्या बाजूनं दिसत नाही. रोहित शर्माला फलंदाज म्हणून संघात स्थान दिल्यास आणि त्याची कामगिरी चांगली न झाल्यास वगळता येईल. मात्र,तो कर्णधार असल्यास गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. याचा टीमवर देखील विपरीत परिणाम होतो, अशी भूमिका निवड समितीची आहे.
रोहितनं 67 कसोटी सामन्यात 40.57 च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. मात्र, विदेशात त्याची सरासरी 31.01 वर येते. ऑस्ट्रेलियात 24.38, दक्षिण आफ्रिकेत 16.63 इतकी आहे. तर, इंग्लंडमध्ये त्याची सरासरी 44.66 इतकी आहे. सलामीवीर म्हणून त्याची इंग्लंडमधील सरासरी 44.44 इतकी आहे.