Rohit Sharma & Hardik Pandya: भारतीय संघाने शनिवारी रात्री बार्बाडोसच्या मैदानात रंगलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला. या विजयामुळे भारताने विश्वचषकाचा (T 20 World cup) 17 वर्षांचा दुष्काळ संपवला. टीम इंडियाचा (Team India) हा विजय अनेक अर्थांना महत्त्वाचा ठरला. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू प्रचंड भावूक झाले होते. यावेळी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यातील केमेस्ट्री सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याने दिमाखदार कामगिरी करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या विजयानंतर हार्दिक पांड्या मैदानातच प्रचंड भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली होती. अखेर काहीवेळाने भावनेचा भर ओसरल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील भावना कॅमेऱ्यासमोर बोलून दाखवल्या. यावेळी कर्णधार रोहित शर्माने केलेली एक कृती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. हार्दिक पांड्या कॅमेऱ्यासमोर बोलत असताना रोहित शर्माने अचानक तिकडे येत हार्दिकचा गालगुच्चा घेतला. हे दृश्य पाहून सर्व भारतीय क्रीडाप्रेमी अवाक झाले.
मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद रोहितकडून काढून दिल्याने हार्दिक पांड्या व्हिलन
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडून अचानक काढून घेण्यात आली होती. त्यानंतर गुजरात टायटन्स संघातून मुंबई इंडियन्सकडे आलेल्या हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड संतापले होते. हे सर्वजण सोशल मीडियावर हार्दिक पांड्यावर अक्षरश: तुटून पडले होते. त्यानंतर हार्दिक पांड्याची कामगिरीही चांगली झाली नव्हती. संपूर्ण आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी खराब झाली होती. या सगळ्याचे खापर हार्दिक पांड्यावर फुटले. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी हार्दिक पांड्या व्हिलन ठरला होता. आयपीएलच्या अनेक सामन्यांवेळी मुंबई इंडियन्सच्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची हुर्रेर्रे उडवली होती. तसेच रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातही कटुता निर्माण झाल्याची चर्चा होती.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बार्बाडोसच्या मैदानातील रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचे मनोमिलन अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. हार्दिकच्या कालच्या कामगिरीमुळे आणि रोहित शर्माच्या कृतीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात हार्दिकविषयी असलेली अढी दूर होऊ शकते. आगामी काळात हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून अधिक स्वीकार्हरता मिळू शकते. यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघ जुन्या फॉर्ममध्ये परत येऊ शकतो.
आणखी वाचा