Hardik Pandya in Final: ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. या विजयाने भारतीय संघाचा विश्चचषक स्पर्धेतील (T 20 World cup) अनेक वर्षांचा दुष्काळ संपला. या सामन्यातील शेवटचे षटक भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकले. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) जिंकण्यासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. यावेळी हार्दिक पांड्या खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा (Team India) तारणहार ठरला.


हार्दिकने शेवटच्या ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूनंतर भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावर एकच जल्लोष झाला. या चेंडूनंतर हार्दिक पांड्याच्या डोळ्यांना अक्षरश: पाण्याची धार लागली. बराच काळ तो मैदानात रडत होता. काही केल्या हार्दिक पांड्याचे अश्रू थांबत नव्हते. यासाठी विशेष कारणही होते. गेल्या सहा महिन्यांचा काळ हा हार्दिक पांड्यासाठी काहीसा आव्हानात्मक राहिला आहे. क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात हार्दिक पांड्या संघर्षाचा सामना करत होता. त्यामुळेच शेवटच्या षटकात भारताला विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिकच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहून लागले.


अन् हार्दिक पांड्याने मनात साचलेलं बोलून दाखवलं


टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलं. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पांड्याला देण्यात आले होते. या निर्णयामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हार्दिकची कामगिरीही चांगली नव्हती, तसेच मुंबई इंडियन्सच्या संघालाही लय सापडली नव्हती. या सगळ्यामुळे हार्दिक पांड्यावर तुफान टीका झाली होती. त्याचा फिटनेस, कामगिरी हे सगळे मुद्दे पुढे करत अनेकांनी हार्दिकचा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात समावेश व्हावा की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु, हार्दिक पांड्याने या सगळ्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.


मात्र, काल अंतिम सामन्यातील विजयानंतर हार्दिक पांड्या अत्यंत भावूक झाला. त्यानंतर हार्दिकने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करुन दिली. त्याने म्हटले की, हा विजय खूप काही आहे. आम्ही खूप भावूक झालो आहोत, आम्ही मेहनत करत होतो पण काहीतरी राहून जात होते. पण आज संपूर्ण देशाला जे हवे ते आम्ही करुन दाखवले. गेल्या सहा महिन्यांचा काळ पाहता हा विजय विशेषत: माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्यासोबत काही गोष्टी अयोग्य घडल्या होत्या. मी त्या काळात एकही शब्द बोललो नव्हतो. पण मला माहिती होतं की, मी सातत्याने मेहनत करत राहिलो तर मी झळाळून निघेने आणि मला हवं ते साध्य करेन. त्यासाठी अशी संधी मिळणे हे अधिक विशेष आहे, असे हार्दिकने म्हटले.


आम्हाला कायम विश्वास होता, फक्त आमची रणनीती योग्यप्रकारे अंमलात आणणे आणि शांत राहून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर दबाव आणण्याची गरज होती. शेवटच्या पाच षटकांमध्ये गोलंदाजी केलेल्या पाच गोलंदाजांना विजयाचे श्रेय जाते. यावेळी गोलंदाजी करताना माझ्या कायम डोक्यात होते की, आपण शांत राहिलो नाही तर मला हवं ते करता येणार नाही. मला प्रत्येक चेंडू टाकताना 100 टक्के द्यायचे होते. मला नेहमीच दबावाखाली खेळायला आवडते, असे हार्दिक पांड्याने सांगितले.


आणखी वाचा






बार्बाडोसच्या मैदानावरची 'पवित्र' माती रोहितनं तोंडात घातली; वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक, Video