Australia vs India 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी वेळ राहिला आहे. हा सामना 6 डिसेंबरला ॲडलेडच्या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी या पिंक बॉल कसोटीत भारताची सलामी कोण देणार याबाबत सस्पेंस होता. पण कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी येऊन जवळपास याचा खुलासा केला.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थित होता. त्या सामन्यात जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली होती. तर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताची सलामी दिली होती. सामन्याच्या पहिल्या डावात ही जोडी काही विशेष करू शकली नाही, पण दुसऱ्या डावात दोघांनी मिळून 200 धावांची भागीदारी करून नवे विक्रम रचले. आता दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. अशा स्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की, आता ओपनिंग कोण करणार? यशस्वी जैस्वाल नक्कीच सलामीवीर असेल, पण त्याच्यासोबत मैदानात उतरणार कोण?
सामन्याच्या एक दिवस आधी गुरुवारी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली, तेव्हा हा सर्वात मोठा प्रश्न होता. रोहित शर्मा म्हणाला, केएल राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, माझ्या बाळाला माझ्या मांडीवर घरून राहुलची बॅटिंग पाहत होतो, तो शानदार खेळला त्यामुळे बदलाची गरज नाही. भविष्यात परिस्थिती वेगळी असू शकते. परदेशात केएल ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्यामुळे तो या क्षणी त्या जागेसाठी पात्र आहे. हे संघाच्या हिताचे आहे आणि हा एक अतिशय सोपा निर्णय आहे. म्हणजे पुढच्या सामन्यातही यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ओपनिंग करताना दिसणार आहेत, रोहित शर्मा मधल्या फळीत 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.
रोहित 2172 दिवसांनंतर कसोटीत देणार नाही सलामी
रोहित शर्मा 2018 साली टीम इंडियाकडून शेवटच्या कसोटीत मधल्या फळीत खेळला होता. यानंतर 2019 मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला, तेव्हा रोहित शर्माने तिथून ओपनिंगची जबाबदारी घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत तो फक्त ओपनिंग करत आहे.
म्हणजेच, 2172 दिवसांनंतर रोहित शर्मा आता कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसणार आहे. ही पिंक बॉलची कसोटी असेल आणि रोहित फलंदाजीला येईपर्यंत चेंडूची चमक थोडी कमी झालेली असेल अशी अपेक्षा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. संघ आणि खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -