Australia vs India 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला गेला. पिंक बॉल टेस्टमध्ये कांगारूंनी जोरदार पलटवार करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेतील विजयाचे खाते उघडले. ही कसोटी केवळ खेळासाठीच नव्हे तर मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील जोरदार वादासाठीही लक्षात राहील. या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माला या विषयावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिले.


ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने 140 धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यातील आपली पकड मजबूत करत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. या सामन्यात हेडने सिराजला षटकार ठोकला, पण भारतीय गोलंदाजानेही जबरदस्त पुनरागमन केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले. विकेट मिळाल्यानंतर तो सेलिब्रेशन करत होता. जेव्हा हेड त्याला काही बोलले आणि त्या बदल्यात सिराजनेही त्याच्याकडे रागात पाहत ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितले.


सिराज-हेडच्या वादावर रोहित काय म्हणाला?


ॲडलेड कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. हिटमॅननेही मुंबईकरासारखी प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा जेव्हा कसोटी असते तेव्हा अशा घटना घडत राहतात आणि भविष्यातही घडत राहतील. सिराज अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना मैदानावर उत्साह दाखवणे आवडते.


रोहित शर्मा म्हणाला, "काय झाले ते मला माहित नाही, पण जेव्हा दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांशी खेळत असतात, अशा गोष्टी घडतात. मला वाटत नाही की आपण त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, हा खेळ त्याचाच एक भाग आहे."






भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने 295 धावांनी विजय मिळवला. ॲडलेडमध्ये खेळवण्यात आलेली दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकून ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर मालिका अधिक रोमांचक बनवली आहे.


हे ही वाचा -


Rohit Sharma : त्याच्यासाठी नेहमी..., टीम इंडियाच्या ढाण्या वाघासाठी रोहित शर्माचा खास संदेश, तिसऱ्या कसोटीत हुकमी एक्का परतणार?