WTC 2023-25 Points Table Updated after AUS vs IND 2nd Test : ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सारखे स्टार फलंदाज फेल ठरले. भारतीय संघाने पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारताने ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य दिले, जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले.






ऑस्ट्रेलियाने घेतली मोठी झेप


भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि त्याचे पीसीटी 60.71 आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका बसला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्याची PCT 57.29 आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाईल. गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये स्थान मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. टीम इंडियाकडे अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत.






नितीश रेड्डी एकटा नडला....


पिंक बॉलच्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पण नितीश रेड्डीने दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक 42-42 धावा केल्या. पण बाकीचे खेळाडू त्याला साथ देण्यात अपयशी ठरले. याच कारणामुळे टीम इंडियाला दोन्ही डावात 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तिसऱ्या दिवशी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी टक्कर देईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही.


हे ही वाचा -


WTC Final Scenario : ॲडलेड कसोटी हरल्यानंतर टीम इंडिया फायनलमधून जाणार बाहेर? समजून घ्या संपूर्ण समीकरण