Virat Kohli Rohit Sharma Team India : आयपीएल 2024 हंगाम सध्या रंगात आलाय. पण या रनसंग्रामानंतर विश्वचषकाचा महाकुंभ होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ जूनमध्ये टी 20 विश्वचषक जिंकण्यासाठी उतरणार आहे. संघ बांधणीसाठी रोहित शर्मा, अजित आगरकर आणि राहुल द्रविड यांच्यामध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाल्याचं समजतेय. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा टी 20 विश्वचषकात सलामीची जबाबदारी पार पाडू शकतात. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत मयंक यादव, हार्दिक पांड्या यांच्यावरही गंभीर चर्चा झाली.
दैनिक जागरणच्या एका वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यामध्ये दोन तास चर्चा झाली. यामध्ये विराट कोहलीला सलामीला संधी देण्याबाबत चर्चा झाल्याचं समजतेय. शुभमन गिलचा पर्याय म्हणून विराट कोहलीला टी 20 विश्वचषकात स्थान दिलं जाऊ शकतं. आयपीएल 2024 मध्ये यशस्वी जायस्वाल याला अद्याप शानदार कामगिरी करता आलेली नाही. सात सामन्यात त्याला फक्त 121 धावाच करता आल्यात. त्यामुळे यशस्वी जयस्वाल याचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरा सलामी फलंदाज म्हणून विराट कोहलीला संघात स्थान मिळू शकतं.
रियान परागवरही चर्चा -
रोहित-राहुल आणि अजित आगरकर यांच्या बैठकीमध्ये रियान पराग याच्याबाबतही चर्चा झाली. रियान पराग याला टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचं तिकिट मिळू शकते. आयपीएल 2024 मधील त्याची कामगिरी शानदार राहिली आहे. रियान पराग यानं सात सामन्यात 318 धावा केल्या आहेत. त्याशिवाय मयंक यादव यालाही संधी देण्याबाबत दीर्घ चर्चा झाली. पण दुखापतीमुळे मयंकचा पत्ता कट होऊ शकतो.
हार्दिक पांड्याला सल्ला -
या बैठकीमध्ये हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर सखोल चर्चा झाली. हार्दिक पांड्याकडून गोलंदाजी आणि फलंदाजी हवी आहे, पण सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे दिसतेय. हार्दिक पांड्याला फलंदाजी आणि गोलंदाजी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये तो धावा खर्च करतोय, तर फलंदाजी धावा काढताना संघर्ष करताना दिसत आहे. विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याची निवड होणं कठीण दिसत आहे. बीसीसीआयकडून हार्दिक पांड्याला नियमित गोलंदाजी करण्याचा सल्ला देण्यात आलाय.