बंगळुरु :आयपीएलच्या (IPL 2024) पहिल्या पर्वापासून ते 16 व्या पर्वापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bengaluru) सातपैकी सहा मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज टेनिस खेळाडू महेश भूपतीनं (Mahesh Bhupati) नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं बीसीसीआयकडे मोठी मागणी केली आहे.
आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या मॅचमध्ये धावसंख्येचा डोंगर उभारला गेला होता. सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 287 धावा केल्या होत्या. आरसीबीनं या धावसंख्येचा पाठलाग करताना 262 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसनं आक्रमक खेळी करुन लढत देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरसीबीचा 25 धावांनी पराभव झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सातपैकी सहा सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानं गुणतालिकेत ते सध्या दहाव्या स्थानावर आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आरसीबीसोबत दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांना देखील एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. आरसीबीच्या सनरायजर्स हैदराबाद विरोधातील पराभवानंतर महेश भूपतीनं एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं क्रिकेटच्या, आयपीएलच्या भल्यासाठी आरसीबीचा संघ नव्या मालकाला विकून टाकावा, अशी विनंती केली आहे.
महेश भूपती काय म्हणाला?
क्रिकेटच्या आणि आयपीएलच्या भल्यासाठी, चाहत्यांच्या, खेळाडूंच्या भल्यासाठी मला वाटतं की बीसीसीआयनं आरसीबीची विक्री केली आहे. नवीन मालक ज्या पद्धतीनं इतर फ्रंचायजी खेळाचा विकास करतात तशा प्रकारे करु शकेल, असं म्हणत महेश भूपतीनं ट्विट केलं आहे.
इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननं देखील आरसीबीकडे तगडे खेळाडू असून ते चांगली कामगिरी करु शकले नाहीत, असं म्हटलं. वॉन म्हणाला की आरसीबी कधीचं विजेतेपद मिळवू शकली कारण ते क्रिकेट वैयक्तिक खेळ नसून सांघिक खेळ आहे हे सिद्ध करु शकले नाहीत. तुम्ही मोठं मोठे खेळाडू घेऊन एका संघात ठेवल्यानंतर जिंकू शकत नाही,हे आरसीबीनं दाखवल्याचं मायकल वॉन म्हणाला. आरसीबीकडे एबी डीव्हिलियर्स, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डु प्लेसिस यांच्यासारखे प्लेअर्स असूनही एकदाही विजेतेपद मिळवू शकलेले नाहीत.
दरम्यान,यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ एक मॅच जिंकल्यानं दोन गुणांसह आरसीबी दहाव्या स्थानावर आहे. ग्लेन मॅक्सवेलनं अपेक्षेप्रमाणं कामगिरी न करता आल्यानं ब्रेक घेतला आहे. आगामी मॅचेसमध्ये आरसीबी विजयाच्या ट्रॅकवर परतणार का हे पाहावं लागेल.
संबंधित बातम्या :