Ind vs Ban Virat Kohli: चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा (Ind vs Ban) पहिला डाव 149 धावांत गुंडाळला आणि यानंतर दुसऱ्या दिवसअखेर तब्बल 308 धावांची भक्कम आघाडी मिळवली. पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने बांगलादेशच्या फलंदाजांचा कंबरडे मोडले.
चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा आहे. अशा प्रकारे भारतीय संघाची आघाडी 308 धावांपर्यंत वाढली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माशिवाय यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली बाद झाले. विराट कोहलीसाठी (Virat Kohli) चेन्नई कसोटी निराशाजनक ठरली. विराट कोहलीला पहिल्या डावात 6 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात 17 धावा करून कोहली बाद झाला. मात्र दुसऱ्या डावातील कोहलीच्या विकेट्सची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर विराट कोहली पायचीत बाद झाला होता. मेहदी हसन मिराजचा चेंडू विराट कोहलीच्या पॅडला लागला. त्यानंतर अम्पायरने त्याला बाद घोषित केले. विराट कोहलीने शुभमन गिलशी संवाद साधला, पण रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, विराट कोहली पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर रिप्लेमध्ये तो नाबाद असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विराट कोहलीच्या पॅडला लागण्यापूर्वी चेंडू बॅटला लागला होता, पण विराट कोहली आणि शुबमन गिल यांना याची कल्पना नव्हती.
रोहित शर्मा आणि अम्पायरची रिॲक्शन व्हायरल-
विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. आता रोहित शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विराट कोहलीनं डीआरएस घेतला असता तर...
विराट कोहली पहिल्या डावात केवळ 6 धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराट कोहलीनं त्यानुसार चांगली सुरुवात देखील केली होती. त्यानं 37 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. मात्र, मेहेदी हसन मिराज याच्या गोलंदाजीवर त्याला एलबीडबल्यू बाद देण्यात आलं. विराट कोहलीनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली नाही. विराट कोहलीच्या विकेटचा रिप्ले पाहिला असता बॉल विराट कोहलीच्या बॅट जवळून जात असताना स्निकोमीटरमध्ये स्पाईक दिसून आला. यामुळं विराट कोहलीनं जर डीआरएस घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असती तर तो नाबाद राहिला ठरला असता, असा दावा क्रिकेट चाहत्यांनी केला आहे.