टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज आणि टी-20 क्रिकेटमधील आक्रमक बॅट्समन रिंकू सिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मैदानावर वादळी खेळी करणाऱ्या रिंकू सिंगच्या (Rinku singh) आयुष्यातील दुसऱ्या इंनिंगला सुरुवात होत असून त्याचा साखरपुडा झाल्याची माहिती समोर आली आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजसोबत रिंकुचा साखरपुडा झाला असून प्रिया सरोज ह्या विद्यमान खासदार आहेत. डाव्या हाताने धुव्वादार फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंगचे हात आता लवकरच लग्नाच्या (Marriage) बेडीत बांधले जाणार आहेत. उत्तर प्रदेशच्या मछली शहरातून प्रिया सरोज खासदार (member of parliment) असून त्या केवळ 25 व्या वर्षीच लोकसभा सदस्य बनल्या आहेत. विशेष म्हणजे रिंकु सिंग हा शाहरुख खानच्या केकेआर संघाचाही खेळाडू असून शाहरुखने त्याच्या लग्नात डान्स करणार असल्याचंही म्हटलं होतं.
रिंकू सिंगची ओळख करुन देण्याची भारतीय क्रिकेट चाहत्यांना गरज नाही. आयपीएल सामन्यात केकेआर संघातून खेळाताना चौकार व षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रिंकूने शाहरुख खाननेचही मन जिंकले होते. केकेआरकडून खेळताना एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला, पराभवाच्या छायेत असलेल्या केकेआरला त्याने आपल्या वादळी खेळीने विजय मिळवून दिला होता. तेव्हापासून ते क्रिकेट चाहत्यांच्या नजरेत भरला. विशेष म्हणजे बॉलिवूड बादशाह शाहरुख खाननेही रिंकुचे कौतुक करत, मी तुझ्या लग्नात डान्स करणार.. असे म्हटले होते. त्यामुळे, आता शाहरुखने डान्स करण्याचा मुहू्र्त जवळ आलाय, असेच म्हणावे लागेल. मुफद्दल वोहरा यांनी ट्विटरवरुन रिंकू सिंगच्या लग्नासंदर्भात माहिती दिली.
दरम्यान, नुकतेच इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रिंकू सिंगचाही या संघात समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघात रिंकुचा स्ट्राईक रेट 160 पेक्षा जास्त असून 2025 च्या आयपीएल हंगामातही तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.
कोण आहे प्रिया सरोज
दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या प्रिया सरोज यांनी सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे. नुक्त्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. प्रिया सरोजचे वडील देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार राहिले आहेत. सन 1999, 2004 आणि 2009 साली ते येथून खासदार होते. त्यांच्यानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत.