DSP Richa Ghosh : भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक ‘डीएसपी’ मिळाला आहे. टीम इंडियाची युवा विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोष हिला पश्चिम बंगाल पोलिसात उपअधीक्षक (DSP) पदावर नियुक्त करण्यात आले आहे. शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (DSP Richa Ghosh) यांनी स्वतःच्या हस्ते ऋचाची नियुक्ती केली. यावेळी राज्य सरकारकडून तिला ‘बांगा भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऋचा घोषला गोल्डन बॅट अन् गोल्डन बॉल प्रदान
या सोहळ्यात क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने ऋचा घोषला गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल प्रदान केला तसेच 34 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऋचाने केवळ 24 चेंडूत 34 धावा करून भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिच्या कामगिरीबद्दल कौतुक करत तिला सोन्याची साखळी देखील भेट दिली.
या सन्मान समारंभाला माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, तसेच दिग्गज महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामी उपस्थित होत्या. ममता बॅनर्जी यांनी ऋचाच्या पालकांचाही सन्मान केला. ऋचापूर्वी दीप्ती शर्मा, मोहम्मद सिराज आणि जोगिंदर शर्मा यांनाही पोलिस सेवेत DSP पद देण्यात आले आहे.
2020 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण अन्...
ऋचा घोषने 2020 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या खेळात जबरदस्त सुधारणा दिसून आली आहे. वर्ल्ड कपमध्ये ऋचाने फिनिशर म्हणून संघासाठी अनेक निर्णायक खेळी खेळली आहे. 2025 च्या विजयानंतर ही तिची दुसरी वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली, कारण 2023 मध्ये ती अंडर-19 विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होती. वर्ल्ड कपच्या आठ सामन्यांत ऋचाने 235 धावा केल्या आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली.
सौरव गांगुली काय म्हणाले?
सौरव गांगुली यांनी ऋचाचे कौतुक करत सांगितले, “आम्हाला विश्वास आहे की ऋचा घोष एक दिवस झूलन गोस्वामीसारखी महान खेळाडू बनेल. कदाचित भविष्यात ती भारतीय संघाची कर्णधार म्हणून उभी असेल.”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या,“झूलन गोस्वामींसारख्या दिग्गजांनी भारतीय महिला क्रिकेटची पायाभरणी केली, आणि ऋचा घोषने त्या परंपरेला पुढे नेत भारताला आयसीसी ट्रॉफी मिळवून दिली.”
हे ही वाचा -