Ravi Shastri On Gautam Gambhir: भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका (Ind vs SA Test Series) गमावल्यानंतर अनेकांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) टीका केली होती. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताने 18 पैकी 10 कसोटी सामने गमावले आहेत, ज्यात गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध आणि आता घरच्या मैदानावर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभवाचा समावेश आहे. भारताच्या या कामगिरीवरुन गौतम गंभीरवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याचदरम्यान आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एका पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलं आहे. एका व्यक्तीला लक्ष्य करणे योग्य नाही, असं रवी शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्री नेमकं काय म्हणाले? (Ravi Shastri On Gautam Gambhir)
लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की खेळाडूंनीही जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही एकाच व्यक्तीला लक्ष्य करू शकत नाही. माझ्यासोबत असे घडले आहे, म्हणून मी माझा अनुभव सांगतोय. जेव्हा असे काही घडते तेव्हा खेळाडूंनीही त्यांच्या चुका स्वीकारल्या पाहिजेत. खेळाडूंना अशी भावना असली पाहिजे की आपण पराभवाला सामोरे गेलो आहोत आणि आपण त्यातून चांगले होऊ. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत गोष्टी पुढे जाणार नाहीत, असं रवी शास्त्रींनी सांगितले. दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही पंगा घेऊ नका, त्यांनी एक बटण दाबलं की आजूबाजूचे सगळे गायब होतील, असंही रवी शास्त्री म्हणाले.
रवी शास्त्रींचा गौतम गंभीरला इशारा- (Ravi Shastri Warns Gautam Gambhir)
रवी शास्त्री यांनी गौतम गंभीरला इशाराही दिला. जर निकाल संघाच्या बाजूने लागले नाहीत तर प्रशिक्षकाला काढून टाकले जाऊ शकते. जर कामगिरी खराब राहिली तर तुम्हाला काढून टाकले जाणार, त्यामुळे संयम आवश्यक आहे. खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी संवाद आणि व्यवस्थापन दोन्ही महत्त्वाचे आहेत, असं रवी शास्त्री म्हणाले.