Ranji trophy semi final 2022 : पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील मुंबईने रणजी चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. रणजी क्रिकेटच्या इतिहासात मुंबईने 47 व्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेशला 180 धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात मुंबईने 4 बाद 533 धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावाच्या आधारावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता मुंबई आणि मध्य प्रदेशमध्ये मुकाबला होणार आहे. 


मुंबईचा पहिला डाव - 
उत्तर प्रदेशचा कर्णधार करण शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक तोमर (113), यशस्वी जायस्वाल (100) यांची शतके. त्याचबरोबर शॅम्स मुलानी (50) याच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून कर्णधार करण शर्माने चार विकेट घेतल्या. तर सौरभ कुमारने दोन आणि यश दयाल याने दोन विकेट घेतल्या. 
 
उत्तर प्रदेशचा पहिला डाव - 
393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशची सुरुवात निराशाजनक झाली. उत्तर प्रदेशने ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. मुंबईच्या गोलंदाजीपुढे उत्तर प्रदेशच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. उत्तर प्रदेशचा संपूर्ण डाव अवघ्या 180 धावांत संपुष्टात आला. उत्तर प्रदेशसाठी शिवम मावीने सर्वाधिक 48 धावा केल्या. तर माधव कौशिकने 38 धावांची खेळी केली. मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. धवल कुलकर्णीला एक विकेट मिळाली.  


मुंबईचा दुसरा डाव - 
पहिल्या डावात 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात झाली. मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि यशस्वी जायस्वाल यांनी दमदार सलामी दिली. पृथ्वी शॉ खोऱ्याने धावा खेचत असताना यशस्वी संयमी फलंदाजी करत होता. पृथ्वी शॉ 71 चेंडूत 64 धावा काढून बाद झाला. पृथ्वी बाद झाल्यानंतर यशस्वी जायस्वालने मोर्चा सांभाळला.  अरमान जाफर आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकी खेळी करत मुंबईची आघाडी भक्कम केली. यशस्वी जायस्वलने 181 आणि अरमान जाफर याने 127 धावांची खेळी केली. सर्फराज खान (नाबाद 59) आणि सॅम्स मुलानी (नाबाद 51) यांनी अर्धशतकी खेळी केली.