Ravindra Jadeja Ranji Trophy : अष्टपैलू रविंद्र जाडेजानं रणजी सामन्यात आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाबाहेर असणाऱ्या रविंद्र जाडेजानं दणक्यात पुनरागमन केलेय. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी रविंद्र जाडेजा फॉर्मात परतला आहे. तामिळनाडूविरोधात जाडेजानं सात विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या मालिकेपूर्वी फिटनेस सिद्ध करण्यासाठी रविंद्र जाडेजा रणजी स्पर्धेत खेळत आहे. सौराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून रविंद्र जाडेजा मैदानात उतरला आहे. जाडेजानं अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत तामिळनाडू संघाचं कंबरडं मोडलं. जाडेजानं 17 षटकात 53 धावांच्या मोबदल्यात सात विकेट घेतल्या आहेत. त्यानं तीन षटकं निर्धावही टाकली.
रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीसमोर तामिळनाडूच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. शाहरुख खान, बाबा इंद्रजीत आणि कर्णधार प्रदोष पॉल यासारखे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. जाडेजाने शाहरुख खानला दोन धावांवर बोल्ड केलं. बाबा इंद्रजीतला 28 धावांवर बोल्ड केलं. तर कर्णधार प्रदोष पॉल यालाही तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विजय शंकर 10, अजीत राम 7, मनिमारन सिद्धार्थ 17 आणि संदीप वारियर 4 यांनाही बाद करत जाडेजानं सौराष्ट्रला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावात रविंद्र जाडेजानं एक विकेट घेतली होची. दोन्ही डावात रविंद्र जाडेजानं आठ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या डावात फलंदाजी करताना रविंद्र जाडेजाला कमाल करता आली नाही. जाडेजाला फक्त 15 धावाच करता आल्या आहेत. आता दुसऱ्या डावात जाडेजाला मोठी खेळी करावी लागणार आहे.
सामना रंगतदार अवस्थेत -
सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. तामिळनाडूनं प्रथम फलंदाजी करताना 324 धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंखेचा पाठलाग करताना सौराष्ट्राचा संघ 192 धावांपर्यंत मजल मारु शकला. पहिल्या डावात तामिळनाडूला मोठी आघाडी मिळाली होती, त्यामुळे सामना सौराष्ट्राच्या हातून निसटला असेच वाटत होते. पण दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जाडेजानं भेदक मारा केला. परिणामी तामिळनाडूचा संघ 133 धावांत गारद झाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्राने एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा केल्या होत्या. विजयासाठी सौराष्ट्राला अखेरच्या दिवशी 86 षटकात 262 धावा करायच्या आहेत. तर तामिळनाडूला 9 विकेट घ्यायच्या आहेत.