India vs New Zealand Ruturaj Gaikwad : एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर आता टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याचं समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड टी 20 मालिकेला मुकणार आहे. ऋतुराज गायकवाड याला उपचारासाठी बेंगलोर येथील एनसीएमध्ये पाठवण्यात आलेय. बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शुक्रवारी रांची येथे न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. त्याआधीच ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याचं समोर आलेय. 'क्रिकबज'च्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो तीन सामन्याच्या टी 20 मालिकेतून बाहेर गेलाय. रिहॅबसाठी ऋतुराज गायकवाडला एनसीएला पाठवण्यात आलेय. तिथं ऋतुराज गायकवाड याच्यावर उपचार होणार आहेत.
याआधीही दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाडला टीम इंडियात खेळण्याची संधी गमवावी लागली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे श्रीलंकाविरोधातील टी 20 मालिकेतून ऋतुराजला माघार घ्यावी लागली होती. तर वेस्ट विडिंजविरोधातील एकदिवसीय मालिकेतूनही त्याला काढता पाय घ्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे न्यूझीलंडविरोधात मायदेशात होणाऱ्या मालिकेतून बाहेर गेल्याचं वृत्त आहे. बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेपूर्वी ऋतुराज गायकवाड रणजी सामन्यात खेळत होता. महाराष्ट्र आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात आठ तर दुसऱ्या डावात खातेही न उघडता बाद झाला होता. दरम्यान, ऋतुरात गायकवाडने आतापर्यंत 9 टी 20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. या 9 सामन्यात गायकवाडने 135 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय एका एकदिवसीय सामन्यातही ऋतुराज खेळलाय. टीम इंडियासाठी ऋतुराजनं ऑक्टोबर 2022 मध्ये अखेरचा सामना खेळला आहे.
टी20 मालिकेचं वेळापत्रक :
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 27 जानेवारी 2023 | रांची |
दुसरा टी-20 सामना | 29 जानेवारी 2023 | लखनौ |
तिसरा टी-20 सामना | 01 फेब्रुवारी 2023 | अहमदाबाद |
भारताचा टी20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार