Hanuma Vihari Latest News Update : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर दुखापत झाल्यानंतरही फलंदाजी करणारे अश्विन, पुजारा आणि हनुमा विहारी तुम्हाला आजही आठवत असतील.. होय, संकटात असताना त्यांनी जिगरबाज खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. आता हनुमा विहारीची जिगरबाज खेळी पुन्हा एकदा चर्चेत आहे.  एका हाताला दुखापत झाली असताना हनुमा विहारीनं फक्त एका हाताने फलंदाजी करत पुन्हा एकदा आपल्या जिगरबाज खेळीचं दर्शन केलेय. गेल्या काही दिवसांपासून हनुमा विहारी टीम इंडियातून बाहेर आहे, तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशीब अजमावत आहे. रणजी स्पर्धेत हनुमा विहारी याने केलेल्या जिगरबाज खेळीचं सध्या कौतुक होत आहे. 


रणजी चषकाच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी (Hanuma Vihari) याचा हाथ फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतरही संघाला गरज होती म्हणून दहाव्या क्रमांकावर फलंदाजासाठी हनुमा विहारी उतरला.. डाव्या हाताने फलंदाजी करत त्यानं सर्वांनाच धक्का दिला. त्यानं फक्त डाव्या हाताने फलंदाजी करत असताना तीन चौकारही लगावले. हनुमा विहारीच्या खेळीचं क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे. मैदानावर असणाऱ्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनीही टाळ्या वाजवून कौतुक केले. सौशल मीडियावर हनुमा विहारीचं कौतुक होत आहे. त्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सायमी खेर हिनेही व्हिडीओ ट्वीट करत हनुमा विहारीचं कौतुक केलेय. 


आंध्र प्रदेशचा दुसरा डाव 93 धावांवर संपला -
दुसऱ्या डावात आंध्र प्रदेशची अवस्था अतिशय बिकट झाली होती. संघाची आपली गरज आहे, हे ओळखून हनुमा विहारी एका हाताने फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला.. त्याने तीन चौकारांच्या मदतीने 15 धावांचं योगदान दिले. एक फटका तर त्यानं स्वीच हिटसारखा लगावला. विहारीच्या जिगरबाज खेळीचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, हनुमा विहारीपेक्षा फक्त दोनचं आंध्र प्रदेशच्या फलंदाजांनी धावा केल्या आहेत. आंध्र प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 93 धावांवर संपुष्टात आला. 






मध्य प्रदेशला विजयासाठी 245 धावांची गरज - 
रणजी चषकातील गतविजेत्या मध्य प्रदेश संघाला चौथ्या डावात विजयासाठी 245 धावांचं आव्हान आहे. मध्य प्रदेशनं दिवसाअखेर एकही विकेट न गमावता 58 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यश दुबे 24 आणि हिमाशु मंत्री 31 धावांवर खेळत होते. त्याआधी आंध्र प्रदेशचा पहिला डाव 379 धावांवर संपुष्टात आला होता. रिकी भुई याने 149 आणि करण शिंदे याने 110 धावांची खेळी केली होती. मध्य प्रदेशला पहिल्या डावात काही खास कामगिरी करता आली नव्हती. मध्य प्रदेशचा पहिला डाव 228 धावांत संपुष्टात आला होता. शुभम शर्मा 51 याने निर्णायक फलंदाजी केली. पण इतर फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या डावात मध्य प्रदेशचा संघ 151 धावांनी पिछाडीवर होता. पण मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात टिच्चून मारा करत आंध्र प्रदेशच्या संघाला 93 धावांत बाद केले होते. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मध्य प्रदेश संघाला 187 धावांची गरज आहे.