Ranji Trophy मुंबई: रणजी चषकात जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा (Mumbai vs JK) अष्टपैलू खेळाडू लॉर्ड शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत दुसऱ्यांदा लाज राखली. कारण रोहित शर्मासह (Rohit Sharma Ranji Trophy) दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पुन्हा एकदा नांगी टाकल्यानंतर, शार्दूल ठाकूरने दणदणीत नाबाद शतक ठोकलं. दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने 7 बाद 274 धावांपर्यंत मजल मारली असून, शार्दूल ठाकूर नाबाद 113 आणि तनुष कोटियन 58 धावांवर खेळत आहेत. मुंबईला दुसऱ्या डावात 188 धावांची आघाडी मिळाली आहे. 



 महत्त्वाचं म्हणजे शार्दूल आणि तनुष कोटियनच्या (Tanush Kotian ) शतकी भागीदारीमुळे आजही मुंबईची लाज राखली. काल पहिल्या डावातही शार्दूलच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 120 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या जम्मू काश्मिरचा पहिला डाव मुंबईने 206 धावांत गुंडाळला होता. त्यामुळे जम्मू काश्मिरकडे पहिल्या डावात 86 धावांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी मोडून मुंबईला जम्मू काश्मिरपुढे टार्गेट ठेवायचं होतं. 






आक्रमक सुरुवात, तरीही स्वस्तात बाद!


दरम्यान, मुंबईकडून दुसऱ्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. या दोघांनीही आक्रमक सुरुवात करुन, अर्धशतकी भागीदारी केली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याने तीन षटकार ठोकून आपल्या फलंदाजीचे संकेत दिले. रोहित शर्मा सेट झाला असं वाटत असतानाच, युधवीर सिंगने (Yudhvir Singh) त्याला बाद केलं. रोहित 28 धावा करुन माघारी परतला. 


यानंतर हार्दिक तामोरे 1, यशस्वी जयस्वाल 26, श्रेयस अय्यर 17, अजिंक्य रहाणे 16, शिवम दुबे 0 आणि शाम्स मुलानी 4 धावांवर बाद झाल्याने, मुंबईची अवस्था 7 बाद 101 अशी झाली होती. 


लॉर्ड शार्दूलने सूत्रं हाती घेतली


मुंबईची दयनीय अवस्था झाल्यानंतर लॉर्ड शार्दूलने खेळाची सूत्रं आपल्या हाती घेतली. काल अर्धशतक ठोकलेल्या शार्दूल ठाकूरने तनुष कोटियनच्या साथीने आधी डाव सावरला, मग फटकेबाजीला सुरुवात केली. आजही शार्दूलने आपल्यातील अष्टपैलू खेळाडूचं दर्शन घडवलं. शार्दूल ठाकूरने खणखणीत शतक ठोकून मुंबईला समाधानकारक आघाडी मिळवून दिली. 


तनुष कोटियनची भन्नाट साथ


शार्दूल ठाकूरला आज फिरकीपटू आणि आर अश्विनचा वारसदार समजलं जातं त्या तनुष कोटियनने भन्नाट साथ दिली. तनुषने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी मुंबईसाठी शतकी भागीदारी रचली. त्यामुळे मुंबईची आघाडी 188 धावांपर्यंत पोहोचली आहे.